नवी दिल्ली (वृत्तसंस्था) इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) उत्तराखंडने योगगुरू बाबा रामदेव यांना १००० कोटी रुपयांची मानहानी नोटीस पाठविली आहे. तसेच येत्या १५ दिवसांत योगगुरु रामदेव यांनी लेखी माफी मागावी तसंच व्हायरल झालेल्या वक्तव्यांबद्दल प्रतिवाद करणारा व्हिडिओ पोस्ट करावा, अशी मागणी आयएमएकडून करण्यात आली आहे.
आयएमए उत्तराखंडचे प्रदेश सचिव डॉ. अजय खन्ना यांच्याकडून मंगळवारी रामदेव यांना सहा पानांची नोटीस धाडण्यात आलीय. रामदेव यांच्या वक्तव्यामुळे आयएमए उत्तराखंडशी निगडीत दोन हजार सदस्यांची मानहानी झाल्याचं, त्यांनी या नोटिशीत म्हटलंय. एका डॉक्टर सदस्याच्या मानहानिसाठी ५० लाख यानुसार एकूण एक हजार कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करण्यात येईल, असा उल्लेख त्यांनी आपल्या नोटिशीत केलाय. बाबा रामदेव यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओतून त्यांनी अॅलोपॅथी उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रतिमेला धक्का देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करण्याखेरीज त्यांच्यावर एफआयआरही दाखल करण्यात येईल, असंही खन्ना यांनी म्हटलंय.
सोबतच ही नोटीस मिळाल्यानंतर ७६ तासांच्या आत कोरोनावर रामबाण उपाय म्हणून प्रचार केल्या जाणाऱ्या ‘कोरोनिल’च्या सगळ्या भ्रम निर्माण करणाऱ्या जाहिराती सगळ्या प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात याव्यात, अशीही मागणी आयएमएनंत केलीय. रामदेव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आणि कारवाईसाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचंही आयएमएनं म्हटलंय.
रामदेवांनी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य
काही दिवसांपूर्वीच बाबा रामदेव एका कार्यक्रमात म्हणाले होते, अॅलोपॅथी औषध घेतल्याने लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. अॅलोपॅथी स्टुपीड आणि दिवाळखोर सायन्स असल्याचेही बाबा रामदेव यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यांवरून वाद वाढल्यानंतर आणि केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या भूमिकेनंतर रामदेव यांनी आपले वक्तव्य मागे घेतले होते.