मुंबई (वृत्तसंस्था) उद्योगपती राज कुंद्रा सध्या तुरुंगात आहेत. मुंबई पोलिसांनी सध्या पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर आता नवीन माहिती समोर येत आहे. राज कुंद्रानं २ वर्षात त्याच्या अॅपचे यूजर्स तीन पट वाढवण्याचं आणि फायदा 8 पट वाढवण्याचा प्लॅन तयार केला होता. तो त्याच्या ११९ फिल्मचं कलेक्शन ८.८४ कोटी रुपयांना विकणार होता.
डिजिटल माध्यमांमधून बेकायदेशीरपणे पैसे कमवण्यासाठी राज कुंद्रा अनेक युक्त्या करत होता. जेव्हा या गोष्टींचा भंडाफोड झाला तेंव्हा त्याने काही डेटा डिलिट करत स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, मुंबई पोलिसांच्या पुरवणी आरोपपत्रात दिलेल्या तपशीलांवरून राजचा डावपेच अयशस्वी झाल्याचे दिसून येते. यामुळे राज कुंद्रा यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज कुंद्रापर्यंत पोलीस कसे पोहोचले?
मुंबई पोलिसांनी गेल्या फेब्रुवारीमध्ये मड बेटावर छापा टाकला आणि एका पोर्न रॅकेटचा पर्दाफाश केला. दरम्यान, या प्रकरणात टीव्ही अभिनेत्री गेहना वशिष्ठ यांचे नाव समोर आले होते. राज यांची कंपनी विहान एंटरप्रायजेसमध्ये उमेश कामत काम करत असल्याची माहिती पोलिसांना गेहनाकडून मिळाली होती. उमेश सर्व व्हिडीओ राज कुंद्रा यांचे लंडनस्थित जावई प्रदीप बक्षी यांना शेअरिंग अॅप्लिकेशनद्वारे पाठवत असे. प्रदीप कंपनी कॅनरीन अॅपवर सर्व व्हिडिओ अपलोड करत असे. उमेश राजच्या कार्यालयातूनच हे व्हिडिओ शेअर करायचा. आरोपपत्रानुसार, ‘हॉटशॉट’ अॅपचे खाते आणि ‘हॉटशॉट’ टेकडाउन ‘नावाचे दोन व्हॉट्सअॅप ग्रुप उमेशच्या मोबाईलवरून सापडले. या दोन्ही ग्रुपचे अॅडमिन स्वत: होते. राज आणि त्याच्या कंपनीचे आयटी प्रमुख रयान थारप, उमेश, प्रदीप बक्षी आणि इतर कर्मचाऱ्यांसह ‘हॉटशॉट’ आणि ‘बोली फेम’ अॅप्सच्या सामग्रीवर काम करण्याऱ्या कर्मचाऱ्यांचे पेमेंट, गूगल आणि अॅपलकडून मिळालेले पेमेंट, वापरकर्त्याच्या कमाईबद्दल व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅप झाली होती. यासंबंधीचे मेल आणि उत्पन्नाचे तपशील वगैरे पाठवले असल्याचे तपासातून समोर आले आहे. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर राज हाच संपूर्ण रॅकेटचा मास्टरमाईंड होता. तो प्रदीप बक्षीच्या माध्यमातून अश्लील व्हिडिओ अपलोड करायचा आणि त्या बदल्यात पैसे कमवायचा.
हे काम बेकायदेशीर असून आपण यात अडकू शकतो हे राजला माहित होते. याचाच पुरावा म्हणजे राजने मोठ्या प्रमाणात डेटा डिलिट केला आहे. विशेष म्हणजे ‘हॉटशॉट’ अॅपवर गुगल प्ले आणि अॅपल स्टोअरने अश्लील सामग्री ठेवल्यामुळे बंदी घातली होती. त्यानंतर राजने ‘बोली फेम’ या नावाने दुसरे अॅप बनवले होते. राजने आयटी विभागाला ‘हॉटशॉट’चा सर्व डेटा डिलीट करण्यास सांगितले होते. गेल्या फेब्रुवारीच्या पोलिस प्रकरणानंतर राजने त्याच्या मोबाइलवरून व्हॉट्सअॅप ग्रुप आणि ‘हॉटशॉट’ अॅपबद्दलच्या चॅट्सही डिलीट केल्या होत्या. रयान थारपच्या मोबाईलमधूनही डेटा हटवण्यात आला होता.