रावेर (प्रतिनिधी) एका विद्यार्थ्याने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना निंभोरा मालधक्क्याजवळ घडली. दिवाळीच्या सुटीत बारावी विज्ञान परीक्षेचे लेखी पेपर सोडविण्याचे काम अपूर्ण राहिल्याने लोकेश महाजन या विद्यार्थ्याने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. सोशल मीडियावरील फोटोवरून त्याची ओळख पटली.
यासंदर्भात अधिक असे की, लोकेश संजय महाजन (वय १७) हा एकुलता मुलगा होता. सरदार जी. जी. हायस्कूलमध्ये इयत्ता बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता. शेतात जाऊन आलोच… असे घरी सांगून तो सकाळी घरातून निघाला तो परत न येण्यासाठी. निभोरा केळी मालधक्क्याच्या पुढे भागलपूर एक्स्प्रेसखाली त्याने आत्महत्या केली. अत्यंत साध्या व सरळ स्वभाव असलेल्या लोकेशच्या खिशात मोबाईल वा कोणतीही ओळख पटेल असा कोणताही पुरावा नव्हता. रावेर पोलिसांनी मृतदेहाचा घटनास्थळी पंचनामा केला. लोकेश याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याची ओळख पटली. शेतकरी संजय पंढरीनाथ महाजन यांचा मुलगा होता. एकुलता भाऊ गेल्याने दोन्ही बहिणींनी एकच आक्रोश केला. या प्रकरणी रावेर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अजय खंडेराव पुढील तपास करीत आहेत.