रोहतक (वृत्तसंस्था) ऐन हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बलात्कार व लैंगिक शोषणाच्या गंभीर प्रकरणात तुरुंगवास भोगणारा डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमित राम रहिम सिंह याला बुधवारी २० दिवसांचा पॅरोल मंजूर झाला आहे. त्यानंतर लगेचच त्याची कडेकोट बंदोबस्तात रोहतक स्थित सुनरिया कारागृहातून सुटका करण्यात आली.
पॅरोलच्या काळात राम रहिम उत्तर प्रदेशातील बरनावा आश्रमात राहणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. तत्पूर्वी मंगळवारी रात्री हरयाणा सरकारने राम रहिमच्या सुटकेचे आदेश जारी केले. पॅरोल मिळताच हरयाणाबाहेर राहणे व सोशल मीडियापासून दूर राहण्याच्या अटीवर त्याला पॅरोल देण्यात आला आहे. जर या अटींचे उल्लंघन झाले तर तत्काळ पॅरोल रद्द करण्यात येईल, असे सरकारने बजावले आहे. दरम्यान, राम रहिमच्या सुटकेवर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला आहे. याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहून काँग्रेसने आपला विरोध दर्शवला. राम रहिम सुटल्याने विधानसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम होईल, असे काँग्रेसने म्हटले आहे. तर दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीत राजकीय लाभ मिळवण्यासाठी राम रहिमला सोडण्यात आल्याचा विरोध राजकीय पक्षांनी केला आहे.