जळगाव (प्रतिनिधी) या बँक खात्यामध्ये दोन कोटी पन्नास लाख रुपये अतिरेक्यांनी पाठविले आहे. तुमच्यासह मुलाला अटक करणार अशी धमकी देत रेल्वे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी सुरेश नथ्थू धांडे (वय ६९, रा. प्रोफेसर कॉलनी) यांना १९ लाख ९५ हजार रुपयात ऑनलाईन फसवणुक केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर धांडे यांनी सायबर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार ऑनलाईन ठगांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डिजिटल युगात फसवणुकीच्या नवनवीन पद्धती वापरून नागरिकांना गंडा घालत असल्याच्या घटना घडत आहे. भुसावळातील प्रोफेसर कॉलनीत राहणारे सुरेश नथ्थुम धांडे हे रेल्वे विभागातून सेवानिवृत्त झालेले आहे. त्यांना दि. १७ सप्टेंबर ते दि. २३ सप्टेंबर दरम्यान, त्यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून आणि व्हॉट्सअॅपवरून कॉल आणि व्हिडिओ कॉल आले. सायबर चोरट्यांनी धांडे यांना, त्यांचे आधारकार्ड मुंबईतील अंधेरी येथील कॉसमॉस बँकेच्या एका खात्याशी लिंक आहे आणि त्या खात्यामध्ये २ कोटी ५० लाख रुपये हे ‘अतिरेक्यांनी’ पाठवले असल्याचे सांगितले. त्यानुसार तुमच्यासह तुमच्या मुलाला अटक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विचारल्याशिवाय कॉल बंद करु नका
धांडे आणि त्यांच्या पत्नीला व्हिडिओ कॉलवर समोर बसवून, त्यांना घराचे दरवाजे, खिडक्या बंद करण्यास सांगण्यात आले. ‘तुम्हाला आणि तुमच्या मुलाला अटक केली जाईल. आम्ही विचारल्याशिवाय व्हिडिओ कॉल बंद करायचा नाही, कुठे जायचे नाही, अशी सक्त धमकी देत आरोपींनी त्यांच्या मनात भिती निर्माण केली.
भितीपोटी ट्रान्सफर केले पैसे
या भीतीपोटी धांडे यांनी आरोपींच्या सूचनांचे पालन केले. आरोपींनी त्यांना त्यांच्या बँक ऑफ इंडिया मधील खात्यातून १९ लाख ९५ हजार, जवळपास वीस लाख रुपये आरटीजीएसद्वारे लुधियाना येथील सिटी युनियन बँकेच्या एका खात्यात तात्काळ ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. धांडे यांनी लागलीच दुसऱ्याच दिवशी सायबर पोलीस स्टेशनला धाव घेऊन तक्रार दाखल करून, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील पोलीस निरीक्षक सतीश गोराडे हे करत आहेत.
















