मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना आणि धनुष्यबाण (Shiv Sena) मिळवण्यासाठी आत्तापर्यंत 2 हजार कोटींचा सौदा झाल्याचा खळबळजनक आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.
बहुमताच्या जोरावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा शिंदे गटच शिवसेना असल्याचा निर्णय शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) दिला आहे. यासोबतच निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण (Shiv Sena Symbol Crisis) हे पक्षचिन्ह देखील बहाल केले आहे. यावरुन राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गंभीर आरोप केला आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण मिळवण्यासाठी आत्तापर्यंत 2 हजार कोटींचा सौदा झाल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांनी रविवारी सकाळी यासंदर्भात एक ट्वीट केले होते. त्यानंतर पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. “माझी खात्रीची माहिती आहे, चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. हा प्राथमिक आकडा आहे आणि १०० टक्के सत्य आहे.. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील..देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते,” असे ट्वीट करत संजय राऊत यांनी मोठा दावा केला होता.
भारतीय जनता पक्षाला वाटलं तर उद्या ते मुंबई आणि महाराष्ट्रही विकत घेतील. आत्तापर्यंत चिन्ह आणि नाव २ हजार कोटी उडवण्यात आले आहेत. यापुढे अनेक गोष्टी विकत घेण्यासाठी प्रयत्न होतील. २ हजार कोटी ही रक्कम लहान नाही. चार अक्षरांचं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळण्यासाठी हे डील झालं आहे. मी ट्विट करून देशाला ही माहिती दिली आहे. आमच्याकडून आमचं नाव आणि चिन्ह हिसकावण्यात आलं आहे त्यासाठी हे एवढं मोठं डील झालं आहे. काही बिल्डरांनी मला ही माहिती दिली आहे त्याचे पुरावे आम्ही लवकरच देऊ असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
शिवसेना भवनासह राज्यभरातील शिवसेनेच्या शाखा कुठेही जाणार नाहीत. उद्धव ठाकरे हेच आमचे सेनापती आहेत, असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे, शिवसेनेला संपवण्यासाठी करण्यासाठी वापरलेलं तंत्र आहे, असा आरोपही संजय राऊतांनी केला.