जळगाव : बोदवड येथील डेअरीचालकाला पावणेतीन कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी दूध व्यावसायिक ज्ञानदेव गणपती साळुंखे (वय ५४, रा. दीपनगर, जयसिंगपूर) याला अटक करण्यात आली. साळुंखेसह अमित बाबासाहेब शेळके (रा. तावदरवाडी, ता. पलूस), अनुप भगवान काळे (रा. कोयनानगर- चिंचवड, ता. हवेली, जि. पुणे) व प्रशांत ऊर्फ सोमनाथ प्रकाश मंगूरकर (रा. टाकळीरोड, मिरज) यांच्यावरही यापूर्वीच गुन्हा दाखल आहे. जळगावच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. या शाखेचे पथकाने सांगली गाठली आणि आरोपीला अटक कन त्याला जळगावी आणले.
दि. २७ फेब्रुवारी २०१७ ते २८ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत फसवणुकीचा प्रकार घडला. फिर्यादी अमरलाल परमानंद खत्री (रा. बोदवड) यांचा दूध डेअरीचा व्यवसाय आहे. खत्री यांनी १५० टन दूध भुकटी पुरविण्यासाठी संशयितांशी करार केला होता. प्रशांत मंगूरकर याच्या मिरज येथील बँक खात्यावर त्यांनी दोन कोटी ७५ लाख रुपयांची रक्कम भरली होती. मात्र, संशयितांनी दूध पावडर पुरविली नव्हती. अमित शेळके व अनूप काळे हे यड़ाव येथील माउली फूड्सचे संचालक व मालक आहेत, तर प्रशांत मंगूरकर हा माउली इस अंतर्गत सिद्धार्थ ब्रॅन्ड दूध भुकटी खरेदी-विक्रीचा वितरक आहे. खत्री यांनी विविध बँक खात्यांतून दोन कोटी ७५ लाख रुपयांची रक्कम मंगूरकर याच्या बँक खात्यात जमा केली होती. पैसे जमा केल्यानंतर भुकटीसाठी तगादा लावल्यानंतर त्यांनी टाळाटाळ सुरू केली होती. यानंतर मंगूरकर याने खत्री यांना दोन कोटींचा दिलेला धनादेशही वटला नव्हता. खत्री यांनी मंगूरकर, काळे व शेळके यांच्याविरोधात पोलिसांत फिर्याद दाखल केली होती.
साळुंखेच्या सांगण्यावरूनच फसवणूक
पोलीस तपासात या तिघांनीही साळुंखे याच्या सांगण्यावरूनच ही फसवणूक केल्याचे समोर आले होते. तिघांनी आपल्या खात्यावरील रकमेपैकी दोन कोटी ६० लाख रुपये साळुंखे याच्या सांगलीतील बँक खात्यात वळवले होते. साळुंखेचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर दि. १३ ऑक्टोबरला पोलिसांनी त्याला अटक केली. त्यावेळी त्याची पाच दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.