पारोळा (प्रतिनिधी) बोरी नदीच्या उगमस्थानी, पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील बोरी धरण १०० टक्के भरल्याची माहिती जळगाव पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली.
पारोळा तालुक्यातील तामसवाडी धरण पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरल्याने धरणाचे ३ दरवाजे उघडले असून त्यातून २ हजार ७०० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे पारोळा तालुक्यातील बोरी नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठी कुणीहि जाऊ नये, तसेच नदी पात्रात गुरे किंवा शेतोपयोगी वस्तू तथा जीवास हानी होईल. असे कृत्य करू नये, असे प्रत्येक गावात दवंडीद्वारे कळवण्यात आले आहे. तसेच कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग वाढवला किंवा कमी होऊ शकतो म्हणून सर्व नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार डॉ. उल्हासराव देवरे यांनी दिली.