जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र तायक्वॉदो खेळाडूंनी जिंकली १० पदके जिंकली आहेत. अभिजीत खोपडे , मृणाली हर्णेकर यांनी २ सुवर्णपदके जिंकली असल्याची माहिती तायक्वॉदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र , मुंबई संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे , महासचिव मिलिंद पठारे यांनी दिली.
गोवा येथे सुरु असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले आहे. २६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर २०२३ दरम्यान ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, गोवा येथे सुरू आहेत. ४३ क्रीडा प्रकार , २८ राज्य व ८ केंद्र षाशित राज्यातील ११ हजार खेळाडूंनी या राष्ट्रीय क्रीडा महाकुंभात सहभाग नोंदवला आहे.
पोंडा येथील इंडोअर स्टेडियम मध्ये पार पडलेल्या तायक्वॉदो क्रीडा प्रकारात महाराष्ट्र तायक्वॉदो खेळाडूंनी १० पदके जिंकली आहेत. क्योरियोगी प्रकारात ५४ किलो वजनगटात अभिजीत खोपडे व पूमसे प्रकारात मृणाली हर्णेकर यांनी २ सुवर्णपदके जिंकली. महिलांच्या ४६ किलो वजनगटात साक्षी पाटील हिने अंतिम फेरी पर्यंत मजल मारुन रौप्यपदक जिंकले. क्योरियोगी प्रकारात मृणाल वैद्य ( ४९ किलो ), निशिता कोतवाल ( ५३ किलो ) , प्रसाद पाटील ( ७४ किलो ), भारती मोरे ( ६२ किलो ), नम्रता तायडे ( ७३ किलो ) यांच्यासह पूमसे प्रकारात वंश ठाकूर ( वयक्तिक पुरुष) व सानिका जगताप , मृणाली हरणेकर , वसुंधरा चेडे ( महिला टीम ) यांनी ७ कांस्यपदके जिंकली. महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय खेळाडू शिवम शेट्टी , श्रीनिधी काटकर , स्वराज शिंदे , शिवम भोसले, तनिश मालवणकर यानीही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. प्रवीण सोंकुल, अमोल तोडणकर व रॉबिन वेल्टर यांनी प्रशिक्षक म्हणून काम पहिले.
तायक्वॉदो फेडरेशन ऑफ इंडिया चे अध्यक्ष डॉ. ईशरी गणेश, महासचिव ऍड. आर डी मंगुवेशकर, स्पर्धा प्रमुख टी. प्रवीणकुमार यांच्यासह तायक्वॉदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र , मुंबई संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे , शिवछत्रपती पुरस्कार विजेते महासचिव मिलिंद पठारे, वेंकटेश्वरराव कररा , शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, धुलिचंद मेश्राम, सुभाष पाटिल, नीरज बोरसे ,अजित घारगे , सतिष खेमसकर यांनी सर्व पदकविजेते खेळाडू व प्रशिक्षक यांचे अभिनंदन केले आहे.
एम.ओ.ए कडून खेळाडूंसोबत भेदभाव – मिलिंद पठारे
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र शासनाकडून सर्व सुविधा दिल्या जातात, मात्र महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन कडून तायक्वांदो खेळाडूंसोबत भेदभाव करण्यात आला आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन चे महासचिव नामदेव शिरगावकर यांनी खेळाडूंना किट मिळू दिले नाही. शासनाचे प्रतिनिधींना, क्रीडा मंत्री , क्रीडा आयुक्त , लोकप्रतिनिधी या सर्वांना चुकीची माहिती देउन त्यांचीही दिशाभूल केली आहे. त्यांना वारंवार आम्ही संपर्क केला मात्र फोन घेतला नाही, मेसेज ला उत्तर देखील दिले नाही. भारत सरकार व इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन ची मान्यता आलेल्या अधिकृत राष्ट्रीय फेडरेशन NSF असलेल्या तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया च्या ऑफिशियल स्पर्धेतून निवड झालेल्या या महाराष्ट्रतील तायक्वांदो खेळाडूंना एमओए च्या घाणेरड्या राजकरणाचा फटका बसला असून शासनाकडे या प्रकाराबद्दल दाद मागण्यात आली असल्याची माहिती तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र , मुंबई चे महासचिव मिलिंद पठारे यांनी दिली.