एरंडोल (प्रतिनिधी) जिल्ह्यात यंदा तब्बल ४०० कोटी रूपयांच्या पाणी पुरवठा योजना मार्गी लागणार असल्याची ग्वाही आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव, सावदा आणि पिंपळकोठा या गावांमधील विविध विकासकामांचे भूमिपुजन आणि लोकार्पण करण्यात आले. आमदार चिमणआबा पाटील यांनी आपल्या मनोगतातून ना. गुलाबराव पाटील यांचा एरंडोल हा जुना मतदारसंघ असून त्यांनी निधी प्रदान करतांना कोणताही भेदभाव केला नाही, यात कमतरता पडू दिली नसल्याचे नमूद केले. ना. गुलाबरावांची साथ ही प्रगतीची साथ असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.
दरम्यान, ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी आपल्या खास शैलीतील ओघवत्या भाषणातून एरंडोल तालुक्यासोबतच्या आपल्या ऋणानुबंधाला पुन्हा उजाळा दिला. आपल्या राजकीय कारकिर्दीत एरंडोल तालुक्याचे महत्वाचे स्थान असून या तालुक्यातील विविध विकासकामांना आपण निधीची कोणतीही कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. जळगाव जिल्ह्यात नियोजन मंडळाच्या माध्यमातून विविध कामांचे अतिशय चोख आणि काटेकोर नियोजन करण्यात आले असून विकासाचे नवीन पर्व सुरू झाले आहे. एरंडोल तालुक्यातही याच प्रमाणे विकासकामे सुरू असल्याबद्दल ना. गुलाबराव पाटील यांनी कौतुकोदगार काढले.