चाळीसगाव (प्रतिनिधी) महाराणा प्रताप ट्रस्ट आयोजित राजपूत समाजाचा राज्यस्तरीय विवाहच्छुक युवक व युवतींचा परिचय मेळावा शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी येथील राजपूत मंगल कार्यालयात पार पडला. यावेळी राज्यभरातून आलेल्या चारशेहून अधिक मुला-मुलींनी परिचय करून दिला.
यावेळी सप्तपदी या विशेषांकाचे प्रकाशन आणि नूतन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष ठाणसिंग अप्पा राजपूत होते. आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार राजीव देशमुख यांच्यासह निर्मल सीड्सच्या प्रमुख वैशाली सूर्यवंशी, जसपाल सिसोदिया, प्रा. रामचंद्र पाटील, धनसिंग वाघ, डॉ. कर्तारसिंह परदेशी, सर्वोदय शिक्षण मंडळाचे संचालक इंद्रसिंह पवार, डॉ. सुनील राजपूत, ट्रस्टचे उपाध्यक्ष सुरतसिंह राजपूत, सचिव अरुणसिंह पाटील, अॅड. धनंजय ठोके, संजय रतनसिंह पाटील, रवींद्र केदारसिंह पाटील, बाजार समितीचे माजी सभापती सरदारसिंह राजपूत, सविता राजपूत, सुचित्रा राजपूत, संचालक अजयसिंह राजपूत उपस्थित होते. या वेळेत जवळपास
४००युवक-युवतींनी आपला परिचय दिला. याबरोबरच आवडीनिवडीही शेअर केल्या. अशा मेळाव्यातून वधू-वर एकत्र येण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी आ. मंगेश चव्हाण यांनी महाराणा प्रताप ट्रस्टच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. संपूर्ण खान्देश परिसरात आणि विशेषतः चाळीसगाव तालुक्यात राजपूत समाजाची एकजूट असून, यामुळेच प्रगतीही होत आहे, असे ते म्हणाले. वधू-वर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून आपल्या समाजातील युवक-युवतींना योग्य जोडीदार शोधण्याची सुवर्ण संधी मिळते. हे कार्य समाजाच्या बळकटीसाठी महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.
यावेळी नूतन इमारतीचे भूमिपूजन आ. चव्हाण यांच्या हस्ते झाले. माजी आ. राजीव देशमुख यांनीही राजपूत समाजाच्या आजवरच्या वाटचालीचे कौतुक केले. वधू-वर परिचय मेळावे ही अलीकडच्या काळातील महत्त्वाची सामाजिक गरज झाली आहे.
ट्रस्टने राज्यभरातील उपवर मुला-मुलींना एका छताखाली आणले आहे, हा उपक्रम स्तुत्य आहे, असे ते म्हणाले. यावेळी सप्तपदी विशेषांकाचे त्यांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले कार्यक्रमाचे यशस्वी साठी महाराणा प्रताप ट्रस्टचे संचालक तसेच वधु वर परिचय मेळाव्याचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले