चाळीसगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय महाविद्यालयातील ४२ विद्यार्थी विधानभवन अभ्यास दौऱ्यासाठी नुकतेच मुंबईसाठी रवाना झाले आहेत.चाळीसगावच्या इतिहासात आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या पहिल्या अभिनव उपक्रमाची शैक्षणिक क्षेत्रात जोरदार चर्चा होत आहे.
आपल्या जीवनात बदल घडविणारे कायदे जिथे घडतात… जिथे आपल्या प्रश्नांवर चर्चा होते… असे राज्याचे सर्वोच्च सभागृह विधानभवन आयुष्यात एकदातरी पाहावे… तेथील कामकाज कसे चालते याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा अशी सर्वांची इच्छा असते… आणि हा योग ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयीन जीवनातच जुळून आला तर ती त्यांच्यासाठी मोठी पर्वणीच ठरते… असाच एक उपक्रम चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी आपल्या मतदारसंघातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला असून शहरातील य.ना.चव्हाण महाविद्यालय (रा.वि. कॉलेज) मधील राज्यशास्त्र विभागाच्या ४२ विद्यार्थ्यांसाठी त्यांनी “चला आपले विधानभवन जाणूया..” या विशेष सहलीचे आयोजन केले आहे. चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच असा उपक्रम लोकप्रतिनिधीने आयोजित केला असल्याने त्याची चर्चा व कौतुक पूर्ण तालुक्यात होत आहे.
दि.१९ रोजी या विद्यार्थ्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या विठाई बसला आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. विशेष म्हणजे आमदार चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर महाविद्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पर्यंत स्वतः बस चालवत नेत पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.