वाशीम (वृत्तसंस्था) रेशनकार्डची दुय्यम प्रत देण्याच्या मोबदल्यात ५०० रुपयांची लाच मागीतल्याच्या तक्रारीवरुन वाशीम एसीबीच्या पथकाने रिसोड येथील तहसीलमधील पुरवठा विभागातील लिपीकाला ताब्यात घेतले आहे. प्रभाकर सिताराम बोरकर असे लिपीकाचे नाव आहे.
रिसोड पुरवठा विभागात लिपीक पदावर कार्यरत प्रभाकर बोरकर याने तक्रारदाराच्या आईच्या नावे असलेल्या राशनकार्डाची दुय्यम प्रत देण्याच्या मोबदल्यात ५०० रुपयांची मागणी केली. सदर रक्कम देणे मान्य नसल्याने तक्रारदाराने वाशीम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार नोंदविली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने केलेल्या पडताळणी व सापळा कारवाईत संबंधित कर्मचाऱ्यांने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. परंतू पोलिस कारवाईचा संशय आल्याने त्याने लाचेची रक्कम स्विकारली नाही.
मात्र, लाचेची मागणी निष्पन्न झाल्या त्यास ताब्यात घेण्यात आले असून मालेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केल्या जात आहे. सदर कारवाई पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके, विनोद मार्कंडे, विनोद अवगळे, योगेश खोटे, आसिफ शेख, रविंद्र घरत, मिलींद चन्नकेशला या वाशीम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. याबाबतचे वृत्त आज स्थानिक प्रसार माध्यमांनी दिले आहे.