जळगाव (प्रतिनिधी) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगत फसवणूक करणाऱ्या हितेश रमेश संघवी याने तक्रारदार हर्षल बारी यांच्याकडून नोकरीसह म्हाडा येथे फ्लॅट देण्यासाठी त्यांच्याकडून तब्बल १३ लाख ३८ हजार रुपये घेतले. बारी यांनी म्हाडाच्या कार्यालयात विचारणा केली असता, त्यांना अर्ज नामंजूर झाल्याचे सांगितले. त्यावर संघवी याने तुमची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केली असून तुम्हाला मुख्यमंत्र्याच्या कोट्यातून फ्लॅट मिळणार असल्याचे आश्वासन दिल्याचे समोर येत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात स्वीय सहायक असून त्याचे बनावट ओळखपत्र दाखवून हितेश संघवी व त्याची पत्नी अर्पिता हितेश संघवी या दाम्पत्याने १८ जणांना ५५ लाख ६० हजारात गंडविले. याप्रकरणी हर्षल बारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन त्या संघवी दाम्पत्याविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून त्यांच्याकडून या गुन्ह्याचा तपास केला जात आहे. संशयिताच्या शोधार्थ पथके देखील रवाना केली असून त्यानुसार त्यांचा शोध घेतला जात आहे.
नोकरीसाठी २५ हजारांपासून ते दोन लाखांपर्यंत उकळली रक्कम
या गुन्ह्यातील तक्रादार हर्षल बारी यांची फसवणूक झाल्यानंतर ज्यांची फसवणुक झाली ते समोर येवू लागले आहे. यामध्ये मोहन वाघ यांच्या मुलाला टीसीची नोकरी लावण्यासाठी २ लाख रुपये, विनोद सोनार (प्रजापत नगर) व सुनील सोनार (पिंप्राळा) या दोघांच्या मुलांना नोकरी लावतो म्हणत त्यांच्याकडून प्रत्येकी १ लाख ५० हजार, ज्ञानेश्वर पाटील (रुख्मीणी नगर) यांना मुलगा व मुलीच्या नोकरीसाठी ३ लाख, राजेंद्र वारुळकर (जळगाव) यांच्या भाच्याच्या व जयेश लाडवंजारी (जळगाव) यांच्या नोकरीसाठी, ज्ञानेश्वर पाटील (रा. जळांद्री, ता. जामनेर), अविनाश शिंदे (रा. जामनेर) या सर्वांकडून प्रत्येकी २ लाख, अशोक महाजन (जळगाव) यांच्या मुलाला नोकरीसाठी १ लाख ५० हजार, संजय लोहार (कुसुंबा कंडारी, ता. जळगाव) यांच्याकडून २५ हजार, जितेंद्र हटकर (जळगाव) यांच्याकडून नोकरीसाठी ५० हजार, अलका सपकाळे (जळगाव) यांच्या मुलाचा अपघात विमा मंजूर करून देण्यासाठी १० हजार रुपये अशी रक्कम उकळली.
टेंडरसह म्हाडाच्या नावाखाली झाली फसवणूक
रेल्वे विभागात टेंडर मिळवून देतो असे सांगत संघवी याने दीपक बारी (जळगाव) यांच्याकडून २ लाख ८५ हजार तर रेल्वे विभागात टेंडर मिळवून देणे व भुसावळ डीआरएम कार्यालयात भाडे तत्वावर वाहन लावून देतो म्हणत ८ लाख रुपये असे एकूण १० लाख ८५ हजार रुपये घेतले. तसेच कुंदन काळे (जळगाव) यांच्याकडून ४ लाख २ हजार, विशाल लिंगायत (जळगाव) यांच्याकडून भुसावळ डीआरएम कार्यालयात वाहन लावण्याकरीता १ लाख रुपये, सुधाकर मावळे (जळगाव) यांच्याकडून बँकेकडून कर्ज मंजूर करून घेण्यासाठी ५० हजार रुपये, म्हाडा फ्लॅटसाठी चेतन कासलीवाल यांच्याकडून ५ लाख रुपये उकळल्याने पुढे येत आहे.
९ महिन्यांपासून सुरु होता फसवणुकीचा खेळ
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगत फसवणूक करणारा हितेश रमेश संघवी याने रेल्वेत टीसी म्हणून नोकरी लावून देतो. असे सांगत दीड लाखांपासून ते चार लाख रुपयांपर्यंतची रक्कम उकळली आहे. तसेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे वाहन भाडे तत्वावर लावून देण्यासाठी त्याने ८ लाख रुपये घेतले असून हा प्रकार गेल्या नऊ महिन्यांपासून सुरु होता