जळगाव (प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ११ मतदारसंघांमध्ये सरासरी ६४.४२ टक्के मतदान झाले आहे. रात्री उशिरापर्यंत काही मतदार संघांमध्ये मतदानाची प्रक्रिया सुरु होती. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत प्रशासकीय यंत्रणेची दमछाक झाली. विशेष म्हणजे गेल्या दोन विधानसभेच्या तुलनेत या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे.
गतवेळच्या तुलनेत मतदानात यावर्षी नवमतदारांचा उत्साह पाहण्यास मिळाला. त्यामुळे मतांचा टक्का वाढला आहे. भुसावळ, जळगाव शहर येथे किंचितशी वाढ झालेली दिसून येते. जिल्ह्यातील १३९ उमेदवारांचे भवितव्य इव्हीएम मध्ये बंद झाले असून येत्या २३ नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बुधवारी पार पडलेल्या मतदानात सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्ह्यात ५४.६९ टक्के मतदान झाले होते. मात्र ५ वाजेनंतर जिल्ह्यातील ११ मतदार संघांमध्ये बहुतांश मतदान केंद्रांवर गर्दी उसळल्याने केंद्रांबाहेर रांगा लागल्या होत्या. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरु होती. पाचोरा तालुक्यात काही केंद्रांवर ९.३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु होती. त्यामुळे सायंकाळच्या मतदानाने जिल्ह्यात मतदानाचा टक्का १० टक्के वाढला आहे. सायं. ५ वाजेनंतर मतदानासाठी अनेक केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. जिल्हाभरात सर्वाधिक मतदान हे रावेर मतदारसंघात ७२.५ टक्के मतदान झाले आहे. त्यापाठोपाठ चाळीसगाव मतदार संघात मतदानाचा प्रतिसाद मिळाला आहे.
जिल्ह्यात ११ विधानसभा मतदार संघांमध्ये १३९ उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. जिल्ह्यातील ३६ लाख मतदारांमधून सरासरी ६४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे येत्या शनिवारी कुणाला कौल मिळणार याबाबत अंदाज बांधणे सुरु झाले आहे. शनिवारी सकाळपासुन मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे मतदानानंतरच मतमोजणीचे काउंटडाऊन सुरु झाले आहे.
जिल्ह्यात रावेर मतदार संघात रेकॉर्ड ब्रेक ७२.५ टक्के मतदान झाले आहे. त्यापाठोपाठ जामनेर मतदार संघात ६९ टक्के मतदान झाले आहे. भुसावळमध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत १० टक्के मतदान वाढले आहे. जळगाव शहरात देखील मतदानाचा टक्का वाढून ७ टक्क्यांनी वर गेला आहे. जळगाव ग्रामीण मध्ये मात्र दीड टक्क्याने मतदान कमी झाले आहे. अमळनेर मतदार संघात २ टक्क्यांनी तर एरंडोलमध्ये ४ टक्क्यांनी मतदान वाढले आहे. चाळीसगावमध्ये मतदान २ टक्क्यांनी घटले असून मुक्ताईनगरात सर्वाधिक ९ टक्क्यांनी मतदान घटले आहे.