चाळीसगाव (प्रतिनिधी) एटीएम मशीनमध्ये पैसे भरण्यासाठी दिलेले असतांना थोडे-थोडे करून तब्बल ६४ लाख ८२ हजार २०० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी बँकेचे कर्मचारी आणि ऑडीटर अशा तिघांविरुद्ध चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरक्षनाथ पोपट डोंगरे (वय ३८ वर्ष,धंदा – नोकरी, रा. शिवशंकर सोसायटी, रुम नं. १६ पाथरवट लेन परेन आईसक्रिमच्या मागे, पंचवटी नाशिक) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, प्रविण देविदास गुरव, दिपक भिकन पवार (दोघं रा. पाटणादेवी रोड, आदित्यनगर चाळीसगाव), चंद्रशेखर एकनाथ गुरव (ऑडीटर, रा. गुजराल पेट्रोलपंप जवळ, निवृत्तीनगर, जळगाव) यांनी संगनमताने चाळीसगाव शहरातील आयसीआयसीआय बँकेचे एक एटीएम व आयडीएफसी बँकेचे एक एटीएम असे दोन तसेच पाचोरा शहरामध्ये मनिस्पॉट एक एटीएम व आयसीआयसीआय बँकेचे एक एटीएम असे दोन, असे एकुण चार एटीएम मशीनमध्ये कंपनीमार्फत बँकेने कंपनीचे नोकर असल्याने विश्वासाने रोख रक्कम भरण्याकरिता दिले होते.
परंतू सदरची रोख रक्कम एटीएम मशीनमध्ये पूर्ण न भरता त्यातून वेळोवेळी थोडी थोडी अशी एकुण ६४ लाख ८२ हजार २०० रुपये स्वता काढून अपहार करुन कंपनीचा विश्वासघात केला आहे. तसेच ऑडीटर चंद्रशेखर गुरव यांनी ऑडीट दरम्यान सदर प्रकार कंपनीच्या निदर्शनास आणून न देता कंपनीस खोटे ऑडीट अहवाल देवून गुरव आणि पवार या दोघांची मदत करून कंपनीचा विश्वासघात करुन अपहार केला. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात भादवि ४०८, ४०९, ४६८, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि सुहास आव्हाड हे करीत आहेत.