मुंबई (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केलीय. दरम्यान, आंदोलन काळात ज्या ७०० शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची पंतप्रधान मोदींनी माफी मागावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
खासदार राऊत यांनी इंग्रजी भाषेत ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या ७०० शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी. तसेच ज्यांनी जीव गमावला त्यांच्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही राऊत यांनी केली आहे. तसेच लाल किल्ल्यावरील हिंसाचाराच्या गुन्ह्यांसह शेतकऱ्यांवरील सर्व खटले मागे घ्यावेत, अशीही मागणी राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे.
या ट्विटपूर्वी खासदार राऊत यांनी पंतप्रधान मोदींच्या कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेनंतर पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात वर्षात पहिल्यांदा देशातील जनतेचा आवाज ऐकला आहे. पहिल्यांदाच त्यांनी मन की बात ऐकली. दिल्लीत अनेक शेतकऱ्यांचा मृत्यूही झाला. हे पाहता त्यांनी जर एक वर्षापूर्वीच ऐकलं असतं तर अनेकांचा जीव वाचला असता, असा टोलाही राऊत यांनी पंतप्रधान मोदींना लगावला आहे.