जळगाव (प्रतिनिधी) आकाशवाणी चौकातून राखेने भरलेले वाहन ओव्हरलोड झाल्याने प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने कारवाई करत वाहन आरटीओ कार्यालयात आणले. त्यावेळी भुसावळ येथील दोन जणांनी मोटार वाहन निरीक्षकासह पथकाला दमबाजी केली. तसेच त्यांना अॅन्टी करप्शनमध्ये अडकविण्याची धमकी देवून जप्त केलेले वाहन पळवून नेले.ही धक्कादायक घटना सोमवारी रात्री ९.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी चालकासह इतर दोन जणांवर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पथकातील मोटर वाहन निरीक्षक सौरभ पाटील यांच्यासह त्यांच्यासोबत असलेले नितीन जठार, स्वप्निल दाभाडे, सहायक मोटर वाहन निरीक्षक कृष्णा नळे आणि चालक विजय चौधरी हे सोमवार दि. १० मार्च रोजी रात्री आकाशवाणी चौकात कारवाई संदर्भात थांबलेले असताना भुसावळकडून येणारे अवजड वाहन क्रमांक (एमएच १९ झेड ८११३) याला थांबविले. वाहनाची चौकशी केली असता चालक संजय सुकलाल सपकाळे यांनी कागदपत्र देऊन वाहनात राख भरलेली असल्याचे सांगितले. दरम्यान काटा पावती दाखविली तर वाहनात ओव्हरलोड असल्याचे निदर्शनास आले.
ओव्हरलोडच्या दंडाची पावती देत वाहन केले जप्त
पथकाने चालकाला ओव्हरलोड असल्याचे कारणावरून ऑनलाइन पद्धतीने ६० हजार रुपयांची ऑनलाईन दंडाची पावती दिली आणि वाहन आरटीओ कार्यालयात जमा करण्याचे सांगितले. त्यानुसार रात्री ९ वाजता वाहन हे आरटीओ कार्यालयात जमा करण्यात आले होते.
अँटी करप्शनमध्ये अडविण्याची दिली धमकी
ही कारवाई सुरु असतांना त्याठिकाणी स्वराज रवी पाटील आणि त्याचा भाऊ पृथ्वी रवी पाटील दोन्ही रा. भुसावळ हे दोघेजण येऊन त्यांनी मोटर वाहन निरीक्षक सौरभ पाटील आणि त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांना धमकावत दमबाजी केली. तसेच यापूर्वी तुमचे अधिकारी अँटी करप्शन मध्ये अडकवले आहे. तुम्हाला देखील खोट्या तक्रारीमध्ये अडकवून टाकू अशी धमकी दिली आणि दमबाजी करत चालकाला वाहन कार्यालयाच्या बाहेर काढण्याचे सांगितले.
बळजबरीने पळवून नेले वाहन तिघांविरुद्ध गुन्हा
धमकी दिल्यानंतर चालक वाहन बाहेर काढत असतांना, अधिकाऱ्यांनी अटकाव केला असता ते राखीने भरलेले अवजड वाहन कार्यालयातून बळजबरीने नेले. दरम्यान या मोटर वाहन निरीक्षक सौरभ पाटील यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दिली आहे. त्यानुसार पहाटे वाहन चालक संजय सुकलाल सपकाळे, स्वराज रवी पाटील आणि पृथ्वी रवी पाटील रा. भुसावळ अशा तिघांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास कैलास दामोदर हे करीत आहे.