चाळीसगाव (प्रतिनिधी) कन्नड – चाळीसगाव रस्त्यावर प्रादेशिक व विभागीय वनपथकाने टाकलेल्या छाप्यात अवैधरित्या लाकूड वाहतूक करणारा एक ट्रक जप्त करण्यात आला. ट्रकमधून सुमारे आठ टन निम व आडजातीचे लाकूड आढळून आले असून त्याची किंमत अंदाजे दहा लाख रुपये इतकी आहे. वनपरिक्षेत्र विभागाचे पथक गस्त घालत असताना जिओ पेट्रोलपंपाजवळ संशयास्पद स्थितीत एक ट्रक उभा असल्याचे आढळले. झडती घेतली असता ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर लाकूड लपवून ठेवलेले असल्याचे स्पष्ट झाले. ट्रकचालक मुदस्सर बेग (रा. मालेगाव) याने विचारपूस करताना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पथकाने ट्रक जप्त करून गुन्हा नोंदवला आहे.
दरम्यान, चाळीसगाव तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा सातत्याने होत आहे. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी यापूर्वीही अवैध वृक्षतोड व वाहतूक प्रकरणे उघडकीस आणून संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. मात्र मालेगाव येथील लाकूड व्यापाऱ्यांची एक टोळी तालुक्यात अवैध वृक्षतोड करून लाकूड ट्रकमधून ठराविक वेळेत मालेगावकडे रवाना करत असल्याची चर्चा जनमानसात आहे. याबाबत संबंधित यंत्रणा अनभिज्ञ कशा? दिसूनही सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे का? असे प्रश्न स्थानिकांमध्ये उपस्थित होत आहेत. गेल्या काही वर्षांत या व्यापाऱ्यांकडून चाळीसगाव तालुक्यात लाखो रुपयांचे लाकूड अवैधरित्या तोडून वाहतूक झाल्याच्या चर्चाही स्थानिकांमध्ये सुरूच आहेत. अवैध वृक्षतोडीवर प्रभावी पावले उचलून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.















