जळगाव (प्रतिनिधी) – पोलिस दलाच्या दक्षता पेट्रोलपंपाच १ कोटी ३३ लाख ७५२ रुपयांचा अपहार करणारा व्यवस्थापक पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक मधुकर वाघ गेल्या महिनाभरापासून फरार होता. महिनाभरापासून स्थानिक गुन्हे शाखेकडून त्याचा शोध घेवूनही तो मिळून येत नव्हता. अखेर सोमवारी दुपारच्या सुमारास संशयित वाल्मिक वाघ हा पोलिसांना स्वतःहून पोलिसांना शरण आला. त्याची प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्याचा वाघ यांच्यासह मुलगा शेखर वाल्मिक वाघ (वय ३३, रा. साईनगर निमखेडी शिवार) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिस दलाच्या मानव संसाधन विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या भास्कर मार्केट समोरील दक्षता पेट्रोलपंपाच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांची जबाबदारी वाल्मीक वाघ यांच्याकडे व्यवस्थापक म्हणून सोपवण्यात आली होती. दि. १२ फेब्रुवारी रोजी वाघ यांचा मुलगा शेखर वाघ याने जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन वडील कोणाला काहीही न सांगता बेपत्ता झाले आहे. तसेच त्यांनी पेट्रोलपंपाच्या हिशोबात मोठी गडबड झाली असून मी त्यात पूर्णपणे अडकलो असल्याचे पत्राद्वारे कळविल्याचे सांगितले. लेखापरिक्षणानंतर १ कोटी ३३ लाख ७५२ रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले. या प्रकरणी वाल्मीक वाघ याच्याविरुद्ध अपहरण आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करीत असतांना स्थानिकगुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी दोन वेगवेगळी पथके रवाना केली होती. या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारावर मुंबई, पुणे यासह उत्तर भारतात देखील त्याचा शोध घेतला, परंतू तो मिळून येत नव्हता.
चौकशीत निलंबीत उपनिरीक्षक वाल्मिक वाघ हा त्याने १ कोटी ३३ लाख इतक्या मोठ्या रकमेचा नव्हे तर केवळ दहा ते पंधरा लाख रुपयांचा अपहार केला केल्याचे सांगत आहे. पोलिसांकडून देखील वाघ याने इतकी मोठी रक्कमेची विल्हेवाट कशी लावली, अपहाराची रक्कम कशा पद्धतीने हस्तगत करता येवू शकते याबाबत चौकशी केली जात होती.
पोलीस अधीक्षकांनी केली स्वतः चौकशी
गेल्या महिनाभरापासून उपनिरीक्षक वाल्मिक वाघ याचा शोध घेवूनही तो मिळून येत नव्हता. अखेर सोमवार दि. ९ मार्च रोजी दुपारच्या सुमारास तो स्वतः हून स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाला. तो हजर झाल्याचे समजताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी त्यांची प्राथमिक चौकशी केली.
मुलाच्या बँक खात्यावर झाले व्यवहार
वाल्मिक वाघ याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्या बँक खात्याची चौकशी केली. यामध्ये त्याच्या बँक खात्यावरुन अपहार झालेल्या काळात मोठ्या प्रमाणात रक्कम ट्रान्सफर झाल्याचे समजते. तसेच वडीलांच्या संपुर्ण व्यवहाराबाबत त्याला माहिती होते. त्यामुळे वाघ यांचा मुलाचा देखील या गुन्ह्यात सहभाग असल्याच्या संशयावरुन शेखर वाल्मिक वाघ याला देखील अटक करण्यात आली आहे.















