नागपूर (वृत्तसंस्था) भुट्टे व खारेदाणे विक्रीच्या ठेल्यावरील लाइट सुरू करताना इलेक्ट्रिक वायरला हात लागून जोरदार करंट लागल्याने बेशुद्ध झालेल्या १३ वर्षांच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रौनक मनोज जयस्वाल, असे मृतकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज रामदुलारे जयस्वाल (४२, रा. प्लॉट नं २३, गारगोटी, सावली अम्मा दर्गा रोड, नागपूर) नंदनवन हद्दीतील ईश्वरनगर चौकातील वैष्णवी रसवंतीसमोर भुट्टे व खारेदाण्याचा ठेला लावतात.दररोज त्यांचा मोठा मुलगा भुट्टे व खारे दाणे विक्री करतो. २२ जुलै रोजी मोठा मुलगा बाहेर गेला असल्याने लहान मुलगा रौनक मनोज जयस्वाल (१३) भुट्टे व खारेदाणे विकण्यासाठी आला.
सायंकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास अंधार झाल्यामुळे त्याने ठेल्यावरील लाइट सुरू करण्याकरिता इलेक्ट्रिक वायरला हात लावला. यावेळी जोरदार करंट लागल्याने तो बेशुद्ध झाला. त्याला उपचाराकरिता हॉस्पिटलमध्ये नेले असता उपचारादरम्यान रात्री ८.३० वाजता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी मनोज रामदुलारे जयस्वाल यांनी दिलेल्या सूचनेवरून नंदनवन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.















