लखनऊ (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशात निवडणुकी (UP election) आधीच भारतीय जनता पक्षाला (BJP) उत्तर प्रदेशात मोठी गळती लागली आहे. भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी आणि आमदारांनी रामराम ठोकत समाजवादी पक्षात (SP) प्रवेश केला आहे. असं असताना समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांच्या सुनेनं भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीला मोठा धक्का बसला आहे.
उत्तर प्रदेशचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मोर्य यांच्याच उपस्थितीत अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या विचारधारेवर मी नेहमीच प्रभावित राहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मोर्य यांचे मी आभार मानते. माझ्या क्षमतेनुसार जी जबाबदारी सोपवाल ती मी पूर्ण करेल. राष्ट्रधर्म माझ्यासाठी सर्वात मोठा आहे. मला राष्ट्रासाठी काम करायचं आहे, असं पक्षप्रवेश केल्यानंतर अपर्णा यादव यांनी सांगितलं.
यावेळी केशव प्रसाद मोर्य यांनी अखिलेश यादवांवर हल्ला चढवला. अखिलेश यादव घरातच अपयशी ठरली आहे. याप्रसंगी मी अधिक काही बोलणार नाही. मात्र, समाजवादी पार्टीने आमच्या योजनांचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही योगी आदित्यनाथ यांच्या उमेदवारीची घोषणा पहिल्याच यादीत केली. अखिलेश यादव यांनी अजून त्यांची उमेदवारी घोषित केली नाही. अखिलेश यादव म्हणतात त्यांनी विकास केला. मग सुरक्षित सीट शोधण्यासाठी एवढा वेळ का घेत आहेत. निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यानंतरही त्यांना अजून मतदारसंघ सापडत नाहीये, असा चिमटा मोर्य यांनी लगावला.
कोण आहेत अपर्णा यादव?
मुलायम सिंह यादव आणि त्यांची दुसरी पत्नी साधना गुप्ता यांचा मुलगा प्रतिक यादव यांची अपर्णा यादव पत्नी आहेत. अपर्णा यादव या मूळच्या उत्तराखंडच्या आहेत. अपर्णा यादव यांनी २०१७मध्ये लखनऊच्या कँट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, भाजप उमेदवार रिटा बहुगुणा जोशींनी त्यांना पराभूत केलं होतं. मात्र, या निवडणुकीत अपर्णा यांनी ६३ हजार मते मिळवली होती. रिटा बहुगुणा या खासदार झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे सुरेश चंद तिवारी चौथ्यांदा विजयी झाले होते.