वाशीम (वृत्तसंस्था) अंगणवाडी मदतनीस या पदावर नियुक्ती देण्यासाठी ३५ हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या मानोरा एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पाच्या कनिष्ठ सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने ४ ऑक्टोबर रोजी मानोरा पंचायत समिती कार्यालय परिसरातून ताब्यात घेतले. मनोज जगन्नाथ भोजापूरे असे लाचखोर लिपीकाचे तर संतोष आत्माराम वानखेडे असे त्याच्या सहकाऱ्याचे नाव आहे.
तक्रारदार यांच्या पत्नीला अंगणवाडी मदतनीस या पदावर निवड करून देण्यासाठी उपरोक्त दोघांनी ५० हजार रुपये लाच मागीतली. यामध्ये तडजोडी ३५ हजार रुपयात व्यवहार नक्की झाला. परंतू सदर लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाने एसीबीकडे तक्रार दिली. वाशीम एसीबीच्या पथकाने केलेल्या पडताळणीत लाचेची मागणी निष्पन्न झाल्याने बुधवारी सापळा रचला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या सापळ्यात लाचखोर अलगत अडकले. यावेळी ३५ हजाराची लाच स्विकारताना मनोज भोजापूरे याला रंगेहाथ पकडण्यात आले. तर खाजगी इसम संतोष वानखेडे याला अद्याप ताब्यात घेतलेले नसल्याचे कळते. सदर कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनात वाशीम एसबीचे पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके, पोलीस निरीक्षक सुजीत कांबळे, पोलीस निरीक्षक बालाजी तिप्पलवाड व असिफ शेख, विनोद अवगळे, नितीन टवलारकार, योगेश खोटे, राहुल व्यवहारे, रवींद्र घरत, चालक नावेद शेख यांच्या पथकाने केली.
















