सोलापूर (वृत्तसंस्था) सदाभाऊ खोत पंचायत राजच्या कामासाठी सांगोल्याच्या दौऱ्यावर असताना हॉटेल मालक अशोक शिनगारे यांनी सदाभाऊ खोत यांना अडवलं. तसेच थकीत बिलासंदर्भात जाब विचारण्यास सुरुवात केली. या प्रकरणी हॉटेल मालक अशोक शिनगारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिनगारे यांच्याविरुध्द सांगोला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदाभाऊ खोत यांचा पंचायतराज समिती दौऱ्यावर असताना ताफा अडवल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे. भादवि 341,186 आणि 104 कलमानुसार शिनगारे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या सर्व प्रकारामागे राष्ट्रवादीचा हात असल्याचा आरोप देखील सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
गुरूवारी सदाभाऊ खोत हे सोलापुरातील सांगोला येथे आले होते. दुपारी पंचायत समितीच्या आवारात ते आले असताना, त्यांना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोरच सांगोला येथील अशोक शिनगारे या हॉटेल मालकाने अडवलं. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील हॉटेलची उधारी द्या, मगच पुढं जावा असं म्हणत अशोक शिनगारे यांनी भररस्त्यात सदाभाऊंची वाट अडवली. यावेळी सदाभाऊ खोत यांनी हॉटेल मालकाची समजूत काढून सुटका करून घेतली. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.