छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) गावाकडून दिवाळी साजरी करून शहरात परतणाऱ्या दाम्पत्यांच्या दुचाकीला कंटनेरने पाठीमागून धडक देत चिरडले. यात पती जागीच ठार झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. पंडित बाबू चव्हाण (४२, रा. रेणुकानगर, गारखेडा परिसर) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे तर वैशाली पंडित चव्हाण (३८) या गंभीर जखमी आहेत.
मृत पंडित चव्हाण हे स्कोडा कंपनीत नोकरीला होते. त्यांना दोन मुले असून दिपावलीच्या सुट्टीनिमित्त ते अंबड तालुक्यातील जोगेश्वरी या मुळ गावात पत्नीसोबत दुचाकीवर गेले होते. दोन्ही मुलांचे खाजगी शिकवणी सुरू असल्यामुळे मुले हे गारखेडा पसिरातील घरीच थांबले होते. रविवारी पहाटे ते जोगेश्वरीवरून (ता. अंबड) दुचाकी (एमएच २० एफ जे २६८८) ने शहरात येत असताना झाल्टाफाटा परिसरातील देवळाई रोडवरील इंडीयन ऑईल पेट्रोल पंपासमोर वेगात जाणाऱ्या कंटनेरने (एमएच १७ बीवाय ६९७४) ने पाठीमागून दुचाकीला जोरदार धडक दिली. यात पंडित चव्हाण हे कंटनेरच्या चाकाखाली सापडल्याने त्यांचा चेंदामेंदा झाला. तर वैशाली या सुध्दा गंभीर जखमी झाल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या दांम्पत्याला नागरिकांनी तात्काळ घाटीत दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी पंडीत यांना तपासून मृत घोषित केले. तर जखमी वैशाली यांच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत.