जळगाव प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसीतील गोडावून मधून नवे ट्रॅक्टरची चोरी करणाऱ्या रेकार्डवरील सराईत गुन्हेगाराला जळगाव एलसीबीने अटक केली आहे. त्याने ट्रॅक्टर चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. मौसीम खान अय्यूब खान वय २६ रा. शाहू नगर, जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
जळगाव एमआयडीसीतील डी सेक्टर भागातील ट्रॅक्टर गोडावूनमधून १७ महिन्यांपुर्वी ट्रॅक्टर चोरीला गेले होते. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाहन चोरीचे गुन्हे उघडकीला आणण्याबाबत पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी सुचना दिल्या होत्या. ट्रॅक्टर चोरीचा गुन्ह्याचा तपास सुरू असतांना रेकॉर्डवरील संशयित आरोपी मौसीम खान अय्युब खान याने ट्रॅक्टर चोरी केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार पोलीस अंमलदार जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, बबन पाटील यांनी संशयित आरोपी मौसीम खान अय्युब खान याला बुधवारी २४ जुलै रोजी सकाळी १० वाजता शाहू नगरातून अटक केली. त्याची चौकशी केली असता त्याने ट्रॅक्टर चोरीची कबुली दिली व हे ट्रॅक्टर वाळू चोरीच्या गुन्ह्यात तालुका पोलीस ठाण्यात जप्त केले असल्याचे सांगितले. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.