अकोला (वृत्तसंस्था) एका 27 वर्षीय महिलेचं एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलावर प्रेम जडलं. प्रेमाखातर तिने घर सोडलं. मात्र, प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचल्यानं अल्पवयीन मुलावरील प्रेम ‘त्या’ महिलेला चांगलंच महागात पडलंय. मुलगा अल्पवयीन असल्याने कायदेशीरदृष्ट्या त्याचा झालेला लैंगिक छळ बघता महिलेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे आणि मुलाला त्याच्या आईवडिलांच्या स्वाधीन केलं आहे.
अकोला शहरालगतच्या कुंभारी येथे वैशाली (काल्पनिक नाव) ही 27 वर्षीय महिला राहत होती. पतीसोबत पटत नसल्याने ती बहिणीच्या नऊ वर्षीय मुलीला सोबत घेऊन राहत होती. या मुलीचे आई-वडील मरण पावल्याने तीच गेल्या चार वर्षांपासून या मुलीचा सांभाळ करायची. ती एमआयडीसीमधील एका दालमिलमध्ये काम करीत होती. सहा महिन्यांपूर्वी या दालमीलमध्ये सचिन (काल्पनिक नाव) हा 17 वर्षीय तरूण कामाला लागला. तो शहरातील खदान भागातील किर्तीनगर भागातील रहिवाशी होता. दालमिलमध्ये काम करतांना या दोघांत चांगलीच मैत्री झाली. अन् मैत्रीचं पुढे प्रेमात रूपांतर झालं. वैशाली प्रेमात आपलं आणि सचिनच्या वयातील अंतर विसरून गेली. त्यांच्या नात्यावर कुणालाच संशय नसल्यानं हे प्रेम आणखीनच फुलत गेलं. अन् 31 जानेवारीच्या रात्री हे दोघेही पळून गेले. वैशालीनं आपल्या बहिणीच्या नऊ वर्षीय मुलीलाही एकटंच टाकून दिलं. या दोघांच्या प्रेमाची कुणकुण कुणालाच नव्हती. मुलगा बेपत्ता झाला म्हणून त्याच्या आई-वडिलांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली. तर महिला बेपत्ता झाली म्हणून खदान पोलीस स्टोशनमध्ये तक्रार दाखल झाली.
अन् फुटलं बिंग
31 जानेवारीला हे दोघेही पळून गेलेत. इकडे मावशी घरी आली नाही म्हणून नऊ वर्षाची चिमुकली सकाळी घरी रडत होती. यावरून घर मालकाने या मुलीला घेत एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. पुढे पोलिसांनी या मुलीला महिला, बाल-कल्याण समितीच्या ताब्यात दिले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत असतांना सचिन अचानक 9 फेब्रुवारी 2022 रोजी घरी आला. त्यानंतर खदान पोलिसांकडून कागदोपत्री कारवाई करून सचिनला आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आलं. त्यानं पोलिसांना हे सारं प्रकरण सांगितलं. पोलिसांनी या महिलेचा शोध घेतला अन तिला ताब्यात घेतलं. प्रेमासाठी आपल्या बहिणीच्या नऊ वर्षीय मुलीला वाऱ्यावर सोडणाऱ्या या महिलेविषयी सर्वांच्याच मनात संतापाची भावना होती.