भुसावळ (प्रतिनिधी) शाळेतील चिमुकल्यांमध्ये होत असलेल्या भांडणानंतर पालकांना समजावण्यासाठी बोलावल्यानंतर संशयितांनी दहशत निर्माण करीत दोन शिक्षकांना बेदम मारहाण केली तसेच एका महिला शिक्षिकेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना जुन्या वरणगाव रोडवरील एजीसी इंग्लिश मेडियम अॅसेम्बली ऑफ गॉड स्कुलमध्ये शनिवार, 5 ऑगस्ट रोजी सकाळी घडली. याप्रकरणी रीपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्यासह पाच संशयितांविरोधात मारहाण, दंगल, विनयभंगाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली.
एजीसी इंग्लिश स्कूलमध्ये लहान मुलांचे भांडण होत असल्याने वाद मिटवण्यासाठी पालकांना बोलावण्यात आले होते. शनिवारी सकाळी 11 वाजता संशयित किशोर सूर्यवंशी, राजू सूर्यवंशी, आनंद सूर्यवंशी, छोटू सूर्यवंशी, रोहन सूर्यवंशी व दोन ते तीन अनोळखी (वरणगाव रोड, भुसावळ) यांनी शाळेत येत दहशत पसरवली. तक्रारदार व शाळेतील शिक्षक आशिष लता साहोता (32, पंधरा बंगला, भुसावळ) व शेख अय्युब शेख युनूस यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली तसेच शाळा सुरू असताना शासकीय कामकाजात अडथळा आणला.
रोहन सूर्यवंशी याने हातातील फायटर फिर्यादी शिक्षक साहोता यांच्या तोंडावर मारून दुखापत केली तसेच संशयित किशोर सूर्यवंशी याने एका महिला शिक्षिकेचा हात पकडत विनयभंग करीत धक्काबुक्की केली, असा आरोप शिक्षक आशिष साहोता यांनी बाजारपेठ पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत केला आहे. याप्रकरणी सर्व संशयितांविरोधात शासकीय कामात अडथळा, मारहाण, विनयभंग, हाणामारीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. किशोर सूर्यवंशी व छोटू सूर्यवंशी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तपास प्रभारी पोलीस निरीक्षक गजानन पडघण करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणात मी वाद मिटवायला गेलो होतो. पण, काहीही संबंध नसताना राजकारण करत मला अडकवण्यात आले. माझे म्हणणे देखील ऐकले नाही, असे रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.