छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) वैजापूर तालुक्यातील बेलगाव येथे चोरटयांनी घरातील लोकांना जबर मारहाण करत पैसे व सोने घेऊन पोबारा केला. ही घटना बेलगाव शिवारातल्या गायकवाड वस्तीवर मंगळवारी (दि. १) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
बेलगाव शिवारात गायकवाड वस्तीवर मंगळवारी मध्यरात्री दरोडा पडला. या घटनेत दरोडेखोरांनी सारंगधर गायकवाड यांना कुल्हाडीने मारून जखमी केले. पत्नी ताराबाई गायकवाड यांना लाथा बुक्क्यांनी व चापटाने मारहाण करत त्यांच्या कानातील, गळ्यातील सोन्याचे दागिने असा ७१ हजारांचा ऐवज लुटून पोबारा केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सारंगधर गायकवाड हे बेलगाव शिवारात शेतवस्तीवर राहतात.
रात्री एक वाजेच्या सुमारास २५ ते ३० वयोगटातील तीन दरोडेखोरांनी घरात घुसून सारंगधर गायकवाड यांच्या कपाळावर कुल्हाडीने वार करून गंभीर जखमी केले व पत्नीलाही जबर मारहाण केली. तर गावातील सुनील गुंजाळ यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील एलसीडी टिव्ही, ईस्तरी तसेच संसार उपयोगी वस्तू चोरट्यांनी चोरून नेली. तसेच जवळच्या घरातही चोरीचा प्रयत्न केला. नागरिकांनी जखमींना वैजापूरच्या दवाखान्यात दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील अनिल धिवरे, ग्रामरक्षक दलाचे संदीप देवकर, प्रवीण सावळे यांनी भेट देऊन पोलिसांना कळवले. सहायक पोलीस अधीक्षक महक स्वामी, निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी छत्रपती संभाजीनगर येथून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी समाधान गायकवाड यांच्या फिर्यादीवरून वैजापूर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.