वसई (वृत्तसंस्था) नायगाव येथील रहिवासी असणाऱ्या एका महिलेला फेसबुकवरील मित्राने तब्बल ८ लाखांना गंडा घातल्याची (facebook friend looted 8 lakh) घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं पीडित महिलेशी प्रेमाचं नाटक करून तिचं लैंगिक आणि आर्थिक शोषण केलं आहे. अखेर पीडित महिलेनं वाळीव पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
नवीन मदनलाल डोगरा असं गुन्हा दाखल झालेल्या ३४ वर्षीय आरोपीचं नाव आहे. आरोपी डोगरा हा हरियाणातील अंबाला येथील रहिवासी आहे. तर पीडित महिला घटस्फोटित असून तिला दहा वर्षांचा एक मुलगा आहे. २०१० साली पीडित महिलेची फेसबुकच्या माध्यमातून आरोपी डोगराशी ओळख झाली होती. काही दिवस गप्पा मारल्यानंतर, आरोपीनं गोड बोलून पीडितेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. तसेच त्यानं आपलं पहिलं लग्न झाल्याची माहिती लपवली. २०१८ साली आरोपी डोगरा हा पीडित महिलेला भेटायला वसईतील नायगाव परिसरातील तिच्या घरी आला होता. यावेळी आरोपीनं पीडित महिलेशी जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडितेनं नकार दिला. पण आरोपीनं तिला लग्नाचं आमिष दाखवल्याने मुलाच्या भविष्याचा विचार करून तिनेही लग्नाचा निर्णय घेतला होता.
पीडितेचा विश्वास संपादन केल्यानंतर आरोपीनं वेळोवळी पीडित महिलेसोबत शरीर संबंध ठेवले. तसेच तिच्याकडे अधून मधून विविध कारणं देत पैशांची मागणी केली. एकेदिवशी त्यानं व्यवसायात मोठं नुकसान झाल्याची बतावणी केली. तेव्हा पीडित महिलेनं आपल्या जवळील सोनं विकून आरोपीला ८ लाख रुपयांची मदत केली. कोरोना दरम्यान पीडित महिलेची नोकरी गेली. त्यामुळे तिने आरोपीकडे उसने दिलेले पैसे परत मागितले. पण आरोपीनं पैसे देण्यास टाळाटाळ करत पीडितेशी संपर्क तोडला. दरम्यान आरोपीचं पहिलं लग्न झाल्याची माहिती कळताच पीडितेन वसईतील वाळीव पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.