सोलापूर (वृत्तसंस्था) सोलापूरमध्ये गावठी पिस्तूल आणि गुप्तीचा धाक दाखवून लोकांना जीवे ठार मारण्याची धमकी देत, त्यांना अश्लील कृत्य करण्यास भाग पाडणाऱ्या चौघांना सोलापुरातील पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.
4 फेब्रुवारी रोजी सोलापूर-तुळजापूर नाका ते रुपाभवानी मंदिर दरम्यान रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडवून त्यांना पिस्तुलचा धाक दाखवून लुटमार एक टोळी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुर्री यांनी गुन्हे शाखेतील अमंलदारांना सोबत घेऊन सापळा रचला यावेळी चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सागर अरुण कांबळे (वय 22 वर्ष), बुध्दभुषन नागसेन नागटिळक, (वय 26 वर्ष ), सतीश ऊर्फ बाबुला अर्जुन गायकवाड (वय 25 वर्ष), अक्षय प्रकाश थोरात (वय 26 वर्ष) अशी ताब्यात घेतलेल्या चार ही आरोपींची नावं आहेत. आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी पिस्तुल, एक धारधार गुप्ती, चार मोबाईल फोन आणि दोन मोटारसायकल मिळून आले. याच आधारे ते येणाऱ्याजाणाऱ्या लोकांना अडवून त्यांना मारहाण करुन त्यांची लुटमार करत असल्याचे लक्षात आले.
अश्लील कृत्य करण्यास भाग पाडत होते
पोलिसांनी या चारही आरोपींना अटक करुन त्यांच्या कडील मोबाईलची तपासणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. पिस्तुलाचा धाक दाखवून लोकांना मारहाण आणि लुटमार तर हे आरोपी करतच होते. मात्र त्यासोबत लोकांना विवस्त्र करत होते, त्यांना अश्लील कृत्य करण्यास भाग पाडत होते, शेण खाण्यास भाग पाडत होते. तसेच अनैसर्गिक संभोग देखील करण्यास भाग पाडत होते. धक्कादायक म्हणजे, या सगळ्या विकृत कृत्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून ते एकमेकांना शेअर देखील करत असल्याचे मोबाईल तपासात निष्पन्न झाले आहे.
यातील पिडीतांनी भितीपोटी पोलिसांत तक्रार दिली नाही. त्यामुळे सोलापूर पोलिसांनी नागरिकांनी आवाहन केले आहे. अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्य केले असल्याबाबत ज्यांच्याकडे माहिती आहे त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा. दरम्यान या चारही आरोपी विरोधात जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे भा.द.वि. कलम 292,506 (2), भारतीय हत्यार कायदा कलम 3,4,25 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 67 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आले आहे. तसेच गावठी पिस्तूल, धारधार शस्त्रे आणि 4 मोबाईल सह एकूण 2 लाख 20 हजारांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोनि/विजयालक्ष्मी कुर्री या करीत आहेत.
यांनी केली कारवाई
सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त डॉ. वैशाली कडुकर, एसीपी डॉ. संतोष गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक केतन मांजरे, आबा थोरात, सुरेश जमादार, अतुल गवळी, खाजप्पा आरेनवरु थिटे, राजेश घोडके, स्वप्निल कसगावडे, गोपाळ शेळके, दत्ता काटे, बाळु माने, नागटिळक, सुहास गायकवाड यांनी केली आहे.