जळगाव (प्रतिनिधी) मनपाचा नगररचना विभाग व वासुकमल इन्फ्रा बिल्डर यांच्यावर ८ दिवसात कारवाई न झाल्यास आपल्या कार्यालयाबाहेर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक भागचंद जैन (अमर जैन) यांनी मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात नमुद करण्यात आले की, मनपा नगररचना विभागाने दि.२२ऑक्टोंबर २०२१ रोजी पिंप्राळा गट नं. २० मधील प्लॉट नं.९ वर सर्व्हीस रोड वरुन बिल्डिंगला ॲप्रोच रोड दिला आहे. तो अनधिकृत असून तेवढाचा धोकेदायक आहे. बिल्डरने प्लॅन मंजूर करतांना मनपाच्या ओपन स्पेसमधून बिल्डींगला रस्ता दिलेला नकाशात स्पष्ट दिसून येत आहे. असे असतांना नगररचना विभागाने प्लॅन मंजूर केलाच कसा; ओपन स्पेसमधून खासगी रस्ता देता येत नसतांना नगररचना विभागाने बिल्डर यांच्याशी संगनमत करुन तेथील रहिवाश्यांची जाणूनबुजून फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच बिल्डरने राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या सर्व्हिस रोडवरच ॲप्रोच रोड जोडून दिलेला आहे. तो अंत्यत घोकेदायक आहे. तसेच आम्ही तक्रार दिल्यानंतर नगररचना विभागाने बिल्डरला नोटीस दिली परंतु बिल्डरने मनपाची नोटीस कचऱ्याच्या पेटीत टाकली असून नोटीसीचे उत्तर दिलेच नाही, त्यामुळे मनपा आयुक्त म्हणून आपण संबधित बिल्डर आर्किटेक्ट व नगररचना विभागातील दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन वासुकमल बिल्डरला दिलेला भोगवटा प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे, अशी मागणी श्री. जैन यांनी निवेदनातून केली आहे.