जामनेर (प्रतिनिधी) ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधानसभेत काल झालेल्या गोंधळावरून तालिका अध्यक्षकांनी विरोधी पक्षातील १२ आमदारांना वर्षभरासाठी निलंबित केले. याच्या निषधार्थ आज जामनेरात आमदार गिरीश महाजन यांच्या पत्नी पदर खोचून रस्त्यावर उतरल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली जामनेरात भाजपचा भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला.
राज्य विधिमंडळात बेकायदा वर्तन केल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या बारा आमदारांना निलंबित करण्यात आले. यांत जामनेर येथील आमदार गिरीश महाजन यांचाही सामावेश आहे. या आमदारांचे निलंबन रद्द करावे, या मागणीसाठी तसेच ही चुकीची कारवाई करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी जामनेर येथे आज भाजपतर्फे भव्य मोर्चा काढण्यात आला. भारतीय जनता पक्षाचे आमदार गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या, तसेच आमदारांचे निलंबन त्वरित रद्द करा, अशीही मागणी करण्यात आली.
तीव्र आंदोलन छेडणार
आमदारांचे चुकीच्या पद्धतीने निलंबन करण्यात आले आहे, ते त्वरित रद्द करण्यात यावे. जर निर्णय रद्द केला नाही तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी साधना महाजन यांनी दिला.