गोंदिया (वृत्तसंस्था) ऑनलाइन गेमच्या माध्यमातून नागपुरातील उद्योगपतीच्या मुलाची ५८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी गोंदियातील सट्टाकिंग अनंत नवरतन जैन याच्या घरावर धाड टाकली. त्यातून तब्बल १५ कोटी रुपये रोख रक्कम, ५ किलो सोन्याची बिस्किटे व २०० किलो चांदी आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे.
शनिवारी सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत केलेल्या चौकशीत हे घबाड समोर आले. पोलिसांची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. गोंदिया शहराच्या सिव्हिल लाइन भागातील काका चौकात जैन यांचे घर असून, मुख्य बाजारपेठेत कुर्त्याचे दुकान आहे. त्याला गोंदियात कुर्तेवाला म्हणून ओळखले जाते. मात्र कुर्ते व्यापाराच्या आडून अनंत हा ऑनलाइन गेमिंगचा व्यवसाय चालवत असे.
नागपुरातील एका प्रसिद्ध व्यापाऱ्याचा मुलगा हा ऑनलाइन गेम खेळताना अनंत जैन याच्या संपर्कात आला. अनंतने त्याची २०२१ ते २०२३ या काळात तब्बल ५८ कोटी ४२ लाख रुपयांची फसवणूक केली. ते लक्षात आल्यानंतर त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. नागपूर पोलिसांत अनंत जैन याच्याविरोधात तक्रार करून गोंदियाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या मदतीने त्याच्या घरावर धाड घातली. तेथून आतापर्यंत १५ कोटी रुपये, पाच किलो सोन्याची बिस्किटे व २०० किलो चांदी जप्त करण्यात आली. कारवाई सुरूच असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
















