जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील चिंचखेडा येथील बालिकेवरील बलात्कार व हत्या प्रकरणातील एलसीबीने अटक केलेल्या आरोपीस आमच्या स्वाधीन करा, अशी मागणी करत जमावाने थेट पोलिस ठाण्यावर तुफान दगडफेक केली. ही घटना गुरुवारी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या १० ते १२ जणांना रात्रीच ताब्यात घेतले होते.
यावेळी संतप्त जमावाने दगडफेकही केली. त्यात पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह १० पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागल्याचे लोकमतने आपल्या वृत्तात म्हटले आहे. तर जमावातून हवेत गोळीबार झाल्याचे ‘दिव्य मराठी’ने म्हटले आहे. पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, तरीही जमाव शांत होत नव्हता, जमावाच्या दगडफेकीत पोलिस ठाण्याच्या काचा फुटल्या. संतप्त जमावाने एक दुचाकी जाळली, अनेक वाहनांच्या काचा फोडल्या. पोलिस ठाण्याबाहेर पोलिसांच्या दुचाकींची तोडफोड करण्यात आली.
दरम्यान, दगडफेकमुळे ठिकठिकाणी दगडांचा खच पडला होता. तर जखमी पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या दगडफेकीत रामदास कुंभार, हितेश महाजन, रमेश कुमावत, संजय राखुंडे, प्रीतम बरकले, संजय खंडारे, सुनील राठोड, मुकुंदा पाटील हे पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. याबाबत माहिती मिळताच जिल्ह्यातून पोलिस कुमक मागवण्यात आली होती.
आक्रमक जमावाने पाचोरा, बोदवड व जळगाव रोडवर रास्तारोको केला. यात पाचोरा उपविभागाचे डीवायएसपी धनंजय वेरुळे यांचे वाहन काही वेळ रोखून धरले, तसेच जळगाव, भुसावळ रस्त्यावरील वाहतूकही अडीच तास रोखली. अचानक झालेल्या प्रकारामुळे शहरातील व मुख्य भागात धावपळ उडाली. त्यानंतर दुकानेही बंद झाली होती. साधारण आठ वाजेला दगडफेक सुरू झाली. यात जमावाने काही मोटरसायकलींची तोडफोड केली तर एक मोटरसायकल जाळून टाकली. टायर पेटवले. सुमारे १५ ते २० मिनिटे धुडगुस घातला. वातावरण चिघळत असल्याचे पाहून पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी काही सहकाऱ्यांच्या मदतीने जमावावर लाठीचार्ज करून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. पण जमावाने प्रतिहल्ला केला.