वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) जगभरात कोरोनाव्हायरसचा संसर्ग होऊन आता दीड वर्ष झाली आहे. मात्र या व्हायरसची सुरुवात नेमकी कुठून झाली याबाबत अद्यापही वाद सुरु आहे. चीनमधूनच कोरोनाचा फैलाव झाल्याचा अनेक देशांचा आरोप असून चीन मात्र हा आरोप फेटाळण्यात आलं आहे. दरम्यान, कोरोनाव्हायरसचा संसर्ग होण्याच्या एक महिना आधी चीनच्या वुहान लॅबमधील तीन संशोधक आजारी पडले होते, असं समोर आलं आहे.
अमेरिकेचं वृत्तपत्र द वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, चीनने जगासमोर कोरोनाची माहिती जाहीर करण्याआधी नोव्हेंबर २०१९ मध्ये वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या (WIV) तीन कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रिपोर्टनुसार तिन्ही कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनासारखी लक्षणं होती. यामध्ये अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या रिपोर्टचा उल्लेख करण्यात आला आहे. नोव्हेंबर २०१९ नंतरच डिसेंबर-जानेवारीदरम्यान जगाला कोरोना महामारीची माहिती मिळाली होती.
वॉल स्ट्रीट जनरलच्या रिपोर्टमध्ये नेमक्या किती संशोधकांना लागण झाली, त्याची वेळ, त्यांच्या रुग्णलयातील कालावधी यांची माहिती देण्यात आली असून यामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या तपासात मदत मिळेल अशी अपेक्षा आहे. कोरोनाचा फैलाव नेमका कुठून झाला यासंबंधी जागतिक आरोग्य संघटना तपास करत आहे. यासाठी त्यांचं एक पथक वुहानमध्येही गेलं होतं. जागतिक आरोग्य संघटना तपासातील पुढचा टप्पा निश्चित करत असतानाच ही माहिती समोर आली आहे.
अमेरिकेच्या सुरक्षा परिषदेचे प्रवक्त्यांनी वॉल स्ट्रीट जर्नलच्या या वृत्तावर कोणतीही टिप्पणी केलेली नाही. पण जो बाइडन प्रशासन ‘कोरोनाव्हायरसच्या उगमाच्या तपासाबाबत गंभीर आहे, असं त्यांनी सांगितलं.
याआधी जागतिक आरोग्य संघटनेची एक टीम महामारीशी संबंधित तथ्यांचं कारण शोधण्यासाठी वुहानला गेली होती. परंतु वुहानच्या लॅबमधूनच कोरोनाव्हायरस जगभरात पसरला हे सिद्ध करण्यासाठी आवश्यक तथ्ये नाहीत, असं डब्लूएचओने म्हटलं होतं. जागतिक आरोग्य संघटनेला तपासात संपूर्ण सहकार्य न केल्याचा आणि वुहान लॅबशी संबंधित माहिती लपवण्याचा आरोपही चीन झाला होता.