धरणगाव (प्रतिनिधी) येथील मरीमातेच्या यात्रोत्सवानिमित्त सालाबादाप्रमाणे भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलने हरियाणा केसरी बंटी खानला आसमान दाखवत ‘खान्देश केसरी’ किताब पटकावला आहे.
धरणगावच्या मरीमातेच्या यात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या या कुस्ती स्पर्धेला सुमारे 200 वर्षांची परंपरा आहे. यावर्षीच्या स्पर्धेत महाराष्ट्रातील पुणे कोल्हापूर सातारा येथील मल्लांसह, दिल्ली पंजाब हरियाणा येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणारे मल्ल सहभागी झाले होते. या कुस्ती स्पर्धेत मानाची कुस्तीत विजयी होणाऱ्या मल्लाला खानदेश केसरी हा किताब देऊन गौरविण्यात येते. यावर्षी खानदेश केसरीची गदा पटकावण्यासाठी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आणि हरियाणा केसरी बंटी खान या दोन मल्लांमध्ये मानाची कुस्ती रंगली होती. अतिशय उत्कंठावर्धक झालेल्या या कुस्तीत पृथ्वीराज पाटीलने बंटी खानला चितपट करत खानदेश केसरीची गदा पटकावली.