जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम व कुष्ठरुग्ण शोध अभियान दि. १ ते १६ डिसेंबर, २०२० या कालावधीत राबविण्यात येत आहे. कुष्ठरोग व क्षयरोग कार्यक्रम हा शासन, जिल्हा परिषद, महानगर पालिका व स्वयंसेवी संस्था यांच्या समन्वयाने राबविण्यात येत आहे.
जळगाव जिल्ह्यातील १५ तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागाचे सर्वेक्षण या अभियानात करण्यात येत आहे. या मोहिमेचे उद्दिष्ट समाजात लपुन राहिलेले कुष्ठरुग्णांना/क्षयरुग्ण शोधुन त्यांना विनाविकृती बरे करुन समाजातील संसर्गाची साखळी खंडीत करणे, क्षयरोग व कुष्ठरोग निर्मूलनाच्या दिशेने प्रयत्न करणे असे आहे. या मोहिमेत एक पुरुष व एक स्त्री असे एक पथक असुन ग्रामीण भागात प्रत्येक दिवशी २० घरे व शहरी भागात २५ घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील एकुण ४३ लाख ६९ हजार ९६६ पैकी ३३ लाख ३७ हजार २९२ लोकसंख्येचे सर्वेक्षणाकरीता एकुण २९७२ पथके व पर्यवेक्षणासाठी ६३० पर्यवेक्षक यांची निवड केलेली आहे. तपासणीसाठी येणाऱ्या पथकांना नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राउत यांनी केले आहे. क्षयरोग/कुष्ठरोग शोध अभियान २०२०-२१ मध्ये जास्तीत जास्त कुष्ठरुग्ण/क्षयरुग्ण शोधुन उपचाराखाली आणून समाजातील योग्य संसर्गजन्य कुष्ठरुग्णांचे व क्षयरुग्णांचे प्रमाण कमी होण्यासाठी मोहिमेमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या टिमकडून तपासणी करुन घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले आहे. आदिवासी भागातील वाडे, वस्त्या, डोंगरभाग, विटभट्या, ऊसतोड मजुर या भागात कुष्ठरोगाविषयी स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी यांची मदत घेवून प्रभावी जनजागृती व या भागातील जनतेची १०० टक्के तपासणी करण्यात येणार आहे. असे डॉ. इरफान तडवी, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) व डॉ जयवंत मोरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
सर्व शासकीय व निमशासकीय दवाखान्यामध्ये कुष्ठरोग/क्षयरुग्ण उपचार मोफत दिला जातो. तरी शरीरावरील बधीर चट्टे व लालसर चकाकणारी त्वचा व जाड कानाच्या पाळ्या, हातपायावरील सुन्नपणा व बधिरता व शारीरीक विकृती यांची तपासणी करुन सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी बी. टी. जमादार, जिल्हा परिषद, जळगाव व जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. नागोजीराव चव्हाण यांनी केले आहे.