धरणगाव (प्रतिनिधी) कामावरून घरी जाण्यासाठी दुचाकीवर निघालेल्या दोघी भावांच्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर सोबत असलेला त्यांचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी २८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता धरणगाव उड्डाणपुलापुढे एरंडोल रोडवर घडली. निलेश झगडू सोनवणे (वय ४५ रा. बांभोरी ता.धरणगाव), असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावात निलेश झगडू सोनवणे हे आपल्या आई-वडील, भाऊ, पत्नी आणि मुलगी यांच्या सोबत वास्तव्याला होते. धरणगाव येथी आरओ पाणी वाटप करण्याचे काम करत होते. नेहमीप्रमाणे आरओचे पाणी वाटप झाल्यानंतर निलेश सोनवणे हा त्यांचा भाऊ अजय सोनवणे यांच्यासोबत दुचाकीने बांभोरी येथे घरी येण्यासाठी बुधवारी २८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता धरणगाव येथून निघाले.
धरणगावहून उड्डाणपुलापुढे हेडगेवारनगरच्या जवळ असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी मालवाहू गाडीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघे भाऊ गंभीर जखमी झाले. दोघांना तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता यातील निलेश सोनवणे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मयताच्या पश्चात आई शांताबाई, वडील झगडू सोनवणे, भाऊ अजय, पत्नी शीतल आणि मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, धरणगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी करीत आहेत.