जळगाव (प्रतिनिधी) मेकॅनिकल इंजीनियरिंगचा पेपर देण्यासाठी जात असलेल्या तरुणांच्या दुचाकीला आयशर ट्रकने धडक दिली या धडकेनंतर दुचाकी समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरच्या खाली येत दुचाकीस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जळगाव शहारातील खोटे नगरजवळील वाटीकाश्रम समोरील राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी दुपारी 1 वाजेच्यां सुमारास हा अपघात झाला. प्रशांत भागवत तायडे (वय-३०, रा. गहूखेडा ता.रावेर जि. जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे. जयेश द्वारकानाथ पाटील (वय-२३, रा. गहूखेडा ता. रावेर) हा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रशांत तायडे आणि जयेश पाटील हे दोघे मित्र रावेर तालुक्यातील गहुखेडा येथील रहिवाशी आहे. दोघेजण धरणगाव तालुक्यातील चिंचपूरा येथील आबासाहेब शिवाजीराव सिताराम पाटील इन्स्टिट्यूट ऑफ पॉलीटेक्नीक येथे मेकॅनिकल इंजीनियरिंग डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून त्यांचे डिप्लोमाचे पेपर सुरू आहेत. आज शुक्रवारी तिसरा पेपर असल्याने दोघे मित्र सकाळी गहुखेडा येथून दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीपी २३५५) ने जळगावमार्गे चिंचपूरा येथे जाण्यासाठी निघाले.
यादरम्यान वाटेतच दुपारी १ वाजेच्या सुमारास जळगावातील खोटे नगर जवळील वाटिकाश्रम समोरील राष्ट्रीय महामार्गवर भरधाव आयशर क्रमांक (एमएच १९ सीवाय ८१६७)ने दुचाकीला मागून धडक दिली. धडकेनंतर दुचाकीवरील दोघेजण रस्त्यावर पडले. तर दुचाकीस्वार प्रशांत थेट समोरून येणाऱ्या खडीने भरलेले ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ एएन २४३८) खाली आला. यात प्रशांत याच्या डोक्यावरून ट्रॅक्टरचे पुढचे चाक गेल्याने या भीषण अपघातात थेट प्रशांत याच हेल्मेटसह डोकं शरीरापासून वेगळं होवून रस्त्यावर पडल होत. तर मागे बसलेला त्याचा मित्र जयेश पाटील हा गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल फेगडे , अनिल मोरे , प्रवीण पाटील या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह तसेच जखमी झालेला जयेश पाटील याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर शासकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. मयत प्रशांत तायडे यांच्या पश्चात आई साधना, वडील भागवत नागेश्वर तायडे आणि विवाहित बहीण असा परिवार आहे. प्रशांत हा एकुलता एक मुलगा होता. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.