शिर्डी(वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांचे विधान ताजे असतानाच आता राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्या नाराजीबाबत वृत्त आलं आहे.
शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंथन शिबीर सुरू आहे. या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते हजर आहेत. शिवाय आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार देखील हजर होते. मात्र अजित पवार शिबिराच्या दुसऱ्या दिवशी पोहोचले नाहीत. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीतील कार्यक्रमात अजित पवार नाराज होऊन निघून गेले होते. मात्र त्यावेळी आपण नाराज नसून लघुशंकेला गेलो होतो, असं ते म्हणाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिराच्या आज दुसरा दिवस असूनही अजित पवार मेळाव्याला आलेले नाहीत.
दरम्यान शरद पवार हजर असलेल्या कार्यक्रमात अजित पवार सहसा जात नाहीत. मेळावा कालपासून सुरुवात झाली आहे. मात्र दुसऱ्या दिवशी अजित पवार हजर न राहिल्याने नाराजीच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार हे त्याच्या आजोळी एका कार्यक्रामासाठी गेले आहेत.