जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपीकाला २ लाख ३० हजार रूपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज अटक केली आहे. वरिष्ठ लिपिक योगेश खोडपे असं लाच घेतलेल्या लिपिकाचे नाव आहे.
यासंदर्भात अधिक असे की, जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागात ऍप्रुव्हल मिळण्यासाठी तक्रारदाराच्या भावाला २ लाख ३० हजार रूपयांची मागणी करण्यात आली होती. या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. यानुसार सापळा रचून आज माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपीक योगेश खोडपे यांना रंगेहात अटक करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या वर्तुळात खळवळ
टेबलावर नोटांचे वजन ठेवल्याशिवाय कागद पुढे सरकावयचा नाही हा शासकीय कार्यालयात जणू अलिखीत नियम झाला आहे मात्र लाचखोरांविरोधात एसीबीने दंड थोपटले असून कुणीही शासकीय अधिकारी वा कर्मचारी कुठलेही शासकीय काम करण्यासाठी पैसे/लाच मागत असल्यास तातडीने एसीबीकडे तक्रार करावी, असे आवाहन एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांनी केले आहे. दरम्यान, जिल्हा परीषदेत लाचखोर वरीष्ठ लिपिकावर कारवाई झाल्यानंतर या प्रकारात कोण कोण अधिकारी आणखी सहभागी आहेत हे पोलिस कोठडीतील चौकशीअंती स्पष्ट होणार असून भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या गोटात कारवाईने प्रचंड थरकाप उडाला आहे.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई नाशिक पोलीस अधीक्षक सुनील कडासने, पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, प्रभारी अपर अधीक्षक सतीश डी. भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत एस. पाटील, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, सहा. फौजदार दिनेशसिंग पाटील, सहा. फौजदार सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, सुनील शिरसाठ, जनार्धन चौधरी, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने केली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.