नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात ट्विटरकडून गेल्या आठवड्यात कारवाई करण्यात आली होती. ट्विटरने राहुल गांधी यांचं खातं तात्पुरतं लॉक केलं होतं. राहुल गांधी यांचे ट्विटर खाते तात्पुरते निलंबित करण्यात आले असताना आता काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्यासह काँग्रेसच्या इतर पाच वरिष्ठ नेत्यांचे अकाऊंटही निलंबित केले आहे. बुधवारी रात्री काँग्रेसकडून ही माहिती देण्यात आली आहे.
काँग्रेस पक्षाने सांगितले की, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सरचिटणीस आणि माजी केंद्रीय मंत्री अजय माकन, लोकसभेत असलेले पक्षाचे मनिकम टागोर, आसामचे प्रभारी आणि माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांचं निलंबित करण्यात आले आहे. काँग्रेसचे सचिव प्रणव झा यांनी बुधवारी रात्री ट्विट केलं की, राहुल गांधी यांच्यानंतर आता राजा नरेंद्र मोदीजी आणि जागीरदार जॅक (ट्विटरचे सीईओ जॅक डोरसे) यांनी रणदीप सुरजेवाला, अजय माकन आणि सुष्मिता देव यांचं ट्विटर अकाऊंट लॉक केलं आहे. यावर काँग्रेसपक्ष विरोध दर्शवते आणि अन्यायांविरुद्ध लढण्याचं आम्ही वचन देतो. ट्विटरनं जितेंद्र सिंह अलवर आणि मणिकम टागोर आणि काही अन्य नेत्यांचे अकाऊंट लॉक केले आहेत.
दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात एका नऊ वर्षांच्या मुलीच्या कुटुंबाची छायाचित्रे ट्विट केली होती, जिची कथितपणे बलात्कार आणि हत्या झाली होती. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) राहुल गांधी यांच्या ट्विटची दखल घेतली आणि अल्पवयीन पीडितेच्या गोपनीयतेचे उल्लंघन केल्याबद्दल काँग्रेस नेत्याच्या खात्यावर कारवाई करण्याचे निर्देश ट्विटरला दिले होते.
दिल्ली छावणीतील स्मशानभूमीत कथित बलात्कार आणि हत्या झालेल्या नऊ वर्षांच्या दलित मुलीच्या आई-वडिलांचे छायाचित्र शेअर केल्यामुळे त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे खाते लॉक केले आहे. शिवाय, ट्विट देखील काढून टाकण्यात आले आहे. तसेच, हे आमच्या धोरणाविरूद्ध असल्याने आम्ही ते ट्विट डिलिट केले असल्याची माहिती ट्विटरकडून दिल्ली उच्च न्यायालयात देण्यात आली होती.