जळगाव (प्रतिनिधी) : विद्यापिठात अनेक वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राची स्थापना करण्यात आली. त्या माध्यमातुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवनावर अभ्यास करणे तसेच त्यांचे विचार, आचारांचा प्रचार व प्रसार करणे, त्यांच्या कार्यपद्धतीवर संशोधन करणे, डॉक्युमेन्टरी तयार करणे वगैरे याबाबत कार्य होणे गरजेचे होते. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्रातील उपक्रम वाढविण्यात यावेत, अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष अॅड. जमील देशपांडे यांनी केली आहे.
यासंदर्भात आज अॅड. जमील देशपांडे यांनी कुलगुरूंची भेट घेत सविस्तर चर्चा केली. तसेच निवेदन देखील दिले. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून सदर अध्यासन केंद्राद्वारे नाममात्र कामकाज झाले आहे. तसेच विद्यापीठामार्फत देखील त्याबाबतची जागरूकता येणेसाठी कोणतेही प्रयत्न करीत नाही. छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राद्वारे ज्यांना काम करण्याची इच्छा असेल त्यांच्याकरीता विद्यापिठामध्ये स्वतंत्र कक्ष, कर्मचारी वर्ग व आर्थिक तरतुद केल्यास अध्यासन केंद्र चांगल्या प्रकारे कार्यान्वीत होऊ शकेल. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला उजाळा मिळू शकेल. नवं संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारख्या थोर राजांचे कर्तृत्व जगासमोर दाखविण्याची संधी मिळेल. म्हणून याबाबत विद्यापिठाने तातडीने निर्णय घ्यावा व जळगाव, धुळे, नंदुरबार या तिनही जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे कक्ष सुरू करावे, अशी मागणी अॅड. जमील देशपांडे यांनी केली. यावर कुलगुरूंनी सकारात्मक प्रतिसाद देत आपण केलेल्या सूचनांची दखल घेतल नवीन उपक्रम सुरु केले जातील, असे आश्वासन दिले.