जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा परिषद प्रशासनातर्फे देण्यात येणारे आदर्श शिक्षण पुरस्कार जाहीर झाले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक या प्रमाणे १५ शिक्षकांना शिक्षकदिनी या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.
आदर्श शिक्षण पुरस्कारासाठी आलेल्या २६ प्रस्तावांमधून मुलाखतीद्वारे ही निवड करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांकडून त्यास मान्यता मिळाली आहे. शिक्षक दिनाला अर्थात ५ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता महाबळ रोडवरील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. कोरोना संसर्गजन्य स्थितीमुळे दोन वर्षांपासून पुरस्काराचे वितरण झाले नव्हते. त्यामुळे मागील दोन वर्षांसह या वर्षांचे असे एकूण ४५ पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
चालू वर्षातील पुरस्काराचे मानकरी दर्शना नथ्थू चौधरी (शिरुड, अमळनेर), मनीषा गोकुळ अहिरराव (यशवंतनगर, भडगाव), रवींद्र माणिक पढार ( मांडवदिगर, भुसावळ), मनीषा नारायण कचोरे (मनूर बु., बोदवड), उत्तम धर्मा चव्हाण (शिवापूर, चाळीसगाव), विश्वनाथ गोरक्षनाथ पाटील (नागलवाडी, चोपडा), संजय पोपट गायकवाड (मुसळी, धरणगाव), लक्ष्मण वामन कोळी (चंदनबर्डी, एरंडोल), ललिता नितीन पाटील (कानळदा, जळगाव), कीर्ती बाबूराव घोंगडे (पहूर कसबे, जामनेर), विजय वसंत चौधरी (पिंप्रीनांदू, मुक्ताईनगर), अरुणा मुकुंदराव उदावंत (राजुरी, पाचोरा), छाया प्रभाकर भामरे ( मोंढाळे, पारोळा), रामराव ज्ञानोबा मुरकुटे ( खिरोदा, रावेर), समाधान प्रभाकर कोळी (साकळी, यावल) यांना यंदाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.