मुक्ताईनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची मुक्ताईनगर टवाळखोरांनी छेडछाड केली होती. या प्रकरणात सात जणांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आता विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. केतन ढाके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण ?
मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात महाशिवरात्रीच्या निमित्ताने आदिशक्ती मुक्ताबाईची यात्रा पार पडली. या यात्रेतील विविध कार्यक्रमांमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची कन्या फराळ वाटप करत होती. यावेळी भोई नावाचा तरुण तिचा पाठलाग करत होता. त्यानंतर सायंकाळी रक्षा खडसे यांची कन्या मैत्रिणीबरोबर फिरायला गेली असता, भोई आणि काही अन्य टवाळखोरांनी तिचा पाठलाग केला. ती ज्या पाळण्यामध्ये बसली होती, त्यातही एक तरुण बसला. काही वेळाने त्यांनी व्हिडिओ तयार केले. हे पाहून सुरक्षा रक्षकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु टवाळखोरांनी सुरक्षारक्षकांसोबत धक्काबुक्की केली. या घटनेमुळे रक्षा खडसे खूप आक्रमक होऊन त्यांनी या टवाळखोरांना तातडीने अटक करण्याची मागणी केली. पोलिसांनी या प्रकरणात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे, ज्यात अनुज पाटील, अनिकेत भोई आणि किरण माळी यांचा समावेश आहे. अन्य तीन आरोपी पियुष मोरे, सोहम कोळी, चेतन भोई हे अद्याप फरार आहेत.
ॲड. केतन ढाके यांची नियुक्ती
या प्रकरणाची राजकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यानंतर शासनाने एक विशेष आदेश काढून ॲड. केतन ढाके यांची मुक्ताईनगर येथील छेडखानी प्रकरणी विशेष सहकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ॲड. केतन ढाके हे याआधी जिल्हा सरकारी वकील म्हणून कार्यरत होते.