जळगाव (प्रतिनिधी) गंभीर गुन्ह्यात अडकवण्यासाठी विजय भास्कर पाटील व किरणकुमार साळुंखे यांनी कट रचून घरात धारदार शस्त्र ठेवल्याची तक्रार नीलेश भोईटे यांनी ऑक्टोबर महिन्यात दिली होती. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पाटील व साळुंखे याा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या गुन्ह्यात आता तत्कालीन सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांच्यासह इतर संशयितांची नावे वाढवण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
भोईटे यांनी दिलेला फिर्यादीनुसार, त्यांच्याविरुद्ध निंभोरा पोलिस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा पुणे येथे वर्ग केलेला होता. या गुन्ह्यात कोथरूड पोलिसांनी जळगावच्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने भोईटे यांच्या जळगावातील भोईटे नगरातील घरी ९ जानेवारी २०२२ रोजी छापा टाकला होता. यावेळी भोईटे घरी नव्हते. या कारवाईत पोलिसांनी तपासणी केल्यानंतर विजय भास्कर पाटील व किरणकुमार साळुंखे हे त्यांच्या स्विफ्ट डिझायर कारने (क्र. एमएच.२०.बीएन.०९०) रात्री १०.१५ ते १०.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या इतर साथीदारांसोबत आले. त्यांनी बेकायदेशीरपणे घरात प्रवेश केला. घरत प्रवेश केल्यानंतर सोबत आणलेल्या काळ्या रंगाच्या कापडी पिशवीत काही फाइल्स व रक्ताने माखलेला चाकू घरात ठेवला.
यामागे मला गंभीर गुन्ह्यात अडकवण्याचा कट आहे. या सर्व बाबींचे सीसीटीव्ही फुटेज व रेकॉर्डिंग असल्याचे भोईटे यांनी तक्रारीत म्हटले होते. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात विजय भास्कर पाटील व किरणकुमार साळुंखे व साथीदारांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास करीत असतांना तक्रारदाराच्या पुरवणी जबाब आणि गुन्ह्याचा तपासीअंती यामध्ये संशयित तत्कालीन सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण, महेश आनंदा पाटील, संजय भास्कर पाटील, मनोज भास्कर पाटील, जयेश भोईटे आणि सुनिल दत्तात्र्य माळी या संशयिताची नावे वाढविण्यात आली आहे. दरम्यान, प्रवीण चव्हाण यांच्या अडचणीत यानिमित्त पुन्हा वाढ झाली आहे.