जळगाव (सुरेश उज्जेनवाल) माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची कन्या जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा ऍड .रोहिणी खडसे यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्याने जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात खळबळ उडाली आहे. राजकीय वैमनस्यातून करण्यात आलेल्या या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शब्द अपुरे पडावेत. षंढ प्रवृत्तीचा निरंकुश उन्माद असेच या हल्ल्याचे वर्णन करता येईल. ऍड रोहिणी यांनी ज्या धैर्याने या हल्ल्याला सामोरे जात स्वतः चा बचाव करीत, हल्लेखोरांना प्रतिआव्हान दिले, ते देखील कौतुकास्पद म्हणावे लागेल. या हल्ल्याच्या घटनेचे तीव्र पडसात समाज मनात उमटणे स्वाभाविकच आहे. हल्लेखोरांचा विविध स्तरातून धिक्कार केला जात आहे. पोलिसांनीही या घटनेची गंभीर दखल घेत संशयितावर गुन्हा दाखल केला आहे.
या हल्ल्याचे जे वर्णन अॅड.रोहिणी खडसे यांनी प्रसारमाध्यमांत केले आहे, ते पाहता त्यातला थरार भयभीत करणारा आहे. जळगाव जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रातील महिला कार्यकर्तीवर झालेला पहिलाच हल्ला असून जिल्ह्याची राजकीय बदनामी करणारा देखील आहे. तसे पाहता काही वर्षापासून जिल्ह्यात राजकीय सूड भावनेचा प्रवाह सुरू आहे. त्यामुळे अलीकडे राजकारणात प्रतिस्पर्धक नव्हे तर शत्रुत्व निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. हीन आणि सूड भावनेच्या राजकारणाने जिल्ह्याच्या उज्वल राजकीय परंपरेलाच छेद दिला आहे. अॅड. रोहिणी खडसेंवरील सशस्त्र हल्ला सूडाच्या राजकारनाचा परिणाम म्हटल्यास अयोग्य होणार नाही.
मुक्ताईनगर तालुक्यातील अवैध धंद्यांबाबत केलेल्या तक्रारींमुळे अवैध धंदेवाईकांची पाठराखण करणाऱ्या कार्यकत्यांचे पित्त खवळले व त्यातून हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचे प्रथमदर्शनी सांगितले जात असले तरी नेमकी वस्तुस्थिती पोलिस तपासातून स्पष्ट होऊ शकेल. मात्र अवैध धंदे ही काही नवी बाब नाही, ते तर निरंतर सुरूच असतात. एक मात्र खरे की, राजकीय वैमनस्य आता एकमेकास संपविण्याच्या मार्गाने सुरू आहे.
ही प्रवृत्ती ठेचण्याचे आव्हान
अॅड. रोहिणी खडसेंवरील हल्ला व हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीला ठेचून काढण्याचे एक मोठे आव्हान आहे. मुळात ऍड रोहिणी खडसे या काही सामान्य व्यक्तिमत्व नाही, तर त्या एक जागरूक सामाजिक, राजकीय पदाधिकारी आहेत. त्याही पेक्षा त्या महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रात मातब्बर व नावलौकिक असलेल्या नेत्यांची कन्या आहे, जर एवढं प्रभाव छत्र असणाऱ्या महिलेवर आपल्याच कार्यक्षेत्रात जीवावर बेतणारा हल्ला होत असेल, तर सामान्य वर्गातून आलेल्या महिला कार्यकर्तीच्या संरक्षणाचे काय? जे कोणी या घटनेतील हल्लेखोर आहेत, त्यांनी तर ते किती षंढ आहेत, हेच सिद्ध केलंय. समाजात पुरुष म्हणून घेण्याचा अधिकारच त्यांनी गमावला आहे.
लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.
(मो.8888889014)