मुंबई (वृत्तसंस्था) विधानसभेच्या हिवाळी अधिवेशन आजपासून सुरुवात पूर्वीच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. जया बच्चन यांच्या सुनबाई आणि मुलासंदर्भात ऐकलं, जे सरकारविरोधात बोलतील, वागतील त्यांना, त्यांच्या कुटुंबियांना ईडी, सीबीआयच्या समोर उभा करणं हे सूत्र झालंय. २०२४ पर्यंत हे चालेल, त्यानंतर उलटी गंगा वाहू लागेल, असं ते म्हणाले.
मुख्यमंत्री चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत यावर प्रतिक्रिया देताना राऊतांनी म्हटलं की, काही क्षण सोडले तर पंतप्रधानांचे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात २२ दिवस दर्शन झालं नाही, काही अडचणी असतात. पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेशच्या प्रचारात दंग आहेत, गृहमंत्री महाराष्ट्रापासून इतर दौऱ्यात दंग आहेत. निदान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे संपूर्ण शासकीय, राजकीय कामं करतायत. चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला, चहापानाची चिंता करू नये. महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ सक्षम आहे, गरज पडली तर ते विधानभवनात येतील असे राऊत म्हणाले.
विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवेळी नियम बदलून निवड कऱण्याची तयारी सत्ताधारी पक्षाची आहे. त्यावरून विरोधकांनी टीका केली आहे. यावर प्रश्न विचारला असता राऊतांनी सांगितलं की, विधानसभा अध्यक्षांची निवड पद्धत नियमबाह्य वाटत असेल तर ते आम्ही केंद्राकडून आम्ही शिकलोय, धडे घेतलेत हे त्यांनी समजून जावं. केंद्राच्या पावलावर पाऊल टाकतोय आणि शिकतोय, केंद्र सरकार किती नियमाने वागतंय हे पूर्ण देशाला माहितीय. एखाद्या व्यवस्थेत काही बदल होत असतील, मोदी सरकारने असे अनेक बदल सात वर्षात केलेत असंही राऊतांनी फडणवीस यांच्या वक्तव्यावर उत्तर देताना म्हटलं.
अधिवेशनाचा कालावधी कमी असल्याची टीका होतेय यावर बोलताना राऊत म्हणाले की, ‘इतर राज्यांमध्ये काय चाललंय ते पहावं लागेल. केंद्राने सूचना दिल्यात. नव्या व्हेरिअंटच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या सूचनांनुसार अधिवेशन होईल. विरोधकांना गोंधळ घालण्यासाठी दिवस वाढवायचे नाहीत, कामाचे दिवस सरकारने ठरवलेत. गोंधळ घालण्यासाठी दिवस देता येणार नाहीत. कामाच्या दिवसात विरोधी पक्षाने त्यांचं काम करावं.’
जया बच्चन यांच्या सुनबाई आणि मुलासंदर्भात ऐकलं, जे सरकारविरोधात बोलतील, वागतील त्यांना, त्यांच्या कुटुंबियांना ईडी, सीबीआयच्या समोर उभा करणं हे सूत्र झालंय. २०२४ पर्यंत हे चालेल, त्यानंतर उलटी गंगा वाहू लागेल असे यावेळी राऊत म्हणाले. केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय. अधिवेशन गुंडाळल्यानतंर पुढची भूमिका काय? असे विचारले असता राऊत म्हणाले की, लखीमपूर खेरी प्रकरणी संबंधित व्यक्तीला तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही. उत्तर प्रदेशात सत्ता बदल होईल आणि देशातही २०२४ ला सत्ता परिवर्तन होईल असं वातावरण आहे. सरकारला शेतकऱ्यांसमोर शरणागती पत्करावी लागली असंही राऊतांनी म्हटलं.