नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली आहे. राहुल गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही भेट झाली आहे. पंजाबमधील आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली असल्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी प्रियांका गांधी, केसी वेणुगोपाल राव आणि हरीश रावत अशी पक्षातील काही वरीष्ठ मंडळी देखील हजर होती. त्यामुळे पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर राजकीय रणनीतीकार म्हणून काम थांबवण्याचे संकेत देणारे प्रशांत किशोर अचानक पुन्हा राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी का घ्यायला लागले आहेत? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. नेमकं प्रशांत किशोर यांचं चाललंय काय? याविषयी तर्त वितर्क लढवले जात आहे. दरम्यान, आज राहुल गांधींसोबत झालेली भेट ही आगामी पंजाब विधानसभा निवडणुका आणि पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वाद या पार्श्वभूमीवर झाल्याचं सांगितलं जात आहे.
गेल्या महिन्याभरात प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांची दोनदा भेट घेतली आहे. त्यानंतर गेल्याच आठवड्यात त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची कपूरथला हाऊस या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर आता प्रशांत किशोर यांनी राहुल गांधींची देखील भेट घेतल्यामुळे त्यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी नुकतचं एक ट्विट केलं होतं. पंजाबबाबत असणारा आपला दृष्टीकोन आणि आपलं काम यांची पारख ‘आम आदमी पक्षा’ला असल्याचा उल्लेख त्यांनी केला होता. या ट्विटनंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या. नवज्योतसिंग सिद्धू पक्षाला आव्हान देण्याचा प्रयत्न करत असल्याची आणि पंजाब काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा सुरु झाली. त्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे सल्लागार प्रशांत किशोर हे राहुल गांधींची भेट घेण्यासाठी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले.
२०१७ साली पंजाब विधानसभा निवडणुकांपूर्वी नवज्योतसिंग सिद्धू भाजपमधून बाहेर पडले. त्यावेळी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीसह अनेक पर्याय त्यांच्यापुढं होते. मात्र अखेर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी पंजाबच्या उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर सिद्धू यांना मिळाल्याचं सांगितलं जात होतं. अर्थात, कुणीही ऑन रेकॉर्ड तशी घोषणा केली नव्हती. प्रत्य़क्षात जेव्हा शपथविधीची वेळ आली, तेव्हा पंजाबच्या उपमुख्यमंत्र्यांची गरजच काय, असा सवाल करत अमरिंदर सिंगांनी ती शक्यता फेटाळून लावली. तेव्हापासून अमरिंदर आणि सिद्धू यांच्यात वितुष्ट असल्याची चर्चा आहे.
२०१७ साली पंजाबमध्ये अमरिंदर सिंग यांचे रणनितीकार म्हणून प्रशांत किशोर यांनी काम पाहिलं होतं. त्यानंतर त्यांना सल्लागारपदी नेमून कॅबिनेट दर्जा पंजाब सरकारनं दिला आहे. त्यामुळं पंजाबमधील प्रश्नाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे प्रतिनिधी म्हणून प्रशांत किशोर राहुल यांच्या भेटीला आल्याचं मानलं जात आहे.